लोकसत्ता टीम
नागपूर: देशभराचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्या फेरीत साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात अटीतटीची लढत आहे.
सकाळी ८वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. टपाल मतदानात प्रथम गडकरी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाची मोजणी सुरू झाली. तेथे गडकरी यांनी साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणार की काँग्रेसचे विकास ठाकरे भाजपकडून आपल्या पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार हे उद्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. नागपूरइतकीच चुरशीची लढत रामटेकमध्ये झाली असून येथे शिवसेनेचे राजू पारवे जिंकणार की काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे परिवर्तन घडवणार, हे स्पष्ट होणार आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत झाली.
२०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका गडकरी यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकल्या होत्या. २०२४ ची निवडणूक त्यांनी केलेल्या दहा वर्षातील विकास कामांच्या मुद्यावर लढली. दुसरीकडे काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी एकजुटीने प्रचारात उतरली होती. भाजपच्या विकासाच्या मुद्याला त्यांनी विकासामुळे विनाशाचा नारा देत प्रत्युत्तर दिले. वंचितचा पाठिंबा, दलित, मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान यामुळे काँग्रेसला यावेळी विजयाची आशा आहे. कमी झालेल्या मतदानाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो. पाच लाखांनी जिंकू, असा दावा यापूर्वी गडकरी यांनी केला होता. ‘एक्झिट पोल’ने भाजपच्या बाजूने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गडकरी हॅटट्रिक करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे एक्झिट पोलचा अंदाज काहीही असला तरी मतदारांचा कौल आपल्या बाजूने असेल, असा विश्वास काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
रामटेकमध्ये तिहेरी लढत
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये यांच्यात तिहेरी लढत झाली. ही निवडणूक काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वादामुळे गाजली. पक्षफुटीमुळे शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी होती. दुसरीकडे ऐनवेळी अर्ज बाद झाल्याने रश्मी बर्वे यांच्या बाजूने सहानुभूती होती. त्याचा फायदा काँग्रेसला होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अपक्ष किशोर गजभिये यांना वंचितने पाठिंबा दिला होता. काँग्रेसला अपेक्षित दलित मतांना गजभिये यांनी छेद दिला असेल तर भाजपच्या पाठबळामुळे सेना बालेकिल्ला कायम राखण्यात यशस्वी होईल का, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
© The Indian Express (P) Ltd