नागपूर :  महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. नागपुरातील मंदिरात याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली, अशी माहिती महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. घनवट म्हणाले, जळगाव येथे फेब्रुवारी महिन्यात तीनशेहून अधिक मंदिर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची बैठक झाली. यामध्ये मंदिराचा निधी, शासनाकडे मंदिरे स्वाधीन करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “आशीष देशमुख हे आंतरराष्ट्रीय नेते, त्यांना…”, अनिल देशमुखांनी उडवली खिल्ली

जळगाव जिल्ह्यातील (ता. अमळनेर) श्री मंगळग्रह मंदिरामध्ये पहिला निर्णय घेण्यात आला. नागपूरमध्ये सुद्धा गेल्यावर्षी बैठक झाली आणि या उपक्रमाला सक्रिय सुरवात झाली. मंदिराचे पावित्र्य टिकविले गेले पाहिजे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेऊन वस्त्र संहिता लागू करण्यात आली. देशातील अनेक मंदिरांमध्ये पूर्वी पासूनच वस्त्र संहिता लागू आहे. तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाने वस्त्र संहिता लागू करण्याचे आदेश दिले होते. ही प्रक्रिया जागृतीची आणि प्रबोधनाची आहे, असेही सुनील घनवट यांनी नमूद केले.  राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिरात हा निर्णय लागू करावा अशी विनंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता

नागपूरमधील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली आहे. यामध्ये श्री गोपालकृष्ण मंदिर, धंतोली, श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी (ता. सावनेर), श्री बृहस्पती मंदिर, कानोलीबारा, श्री दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिराचा समावेश आहे.

मंदिराबाहेर फलक लागणार

काही जण अज्ञानापोटी तोकडे कपडे घालतात. मात्र, मंदिरात प्रवेश करताना अशा स्त्री पुरुषांना  ओढणी, रुमाल आदी कापड अंगावर घेऊनच प्रवेश करण्याचा आग्रह मंदिर संस्थांकडून करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर तसा फलकही लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mandir mahasangh impose dress code in temples vmb 67 zws