नागपूर : वणव्यांमुळे उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या तीनही राज्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान झाले. या क्रमात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात वणव्यांची तब्बल १६००८ प्रकरणे नोंदवण्यात आली. यात सर्वाधिक सात हजार ४२ वणवे गडचिरोली जिल्ह्यात लागले. दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील वणव्यांची संख्या किंचित कमी झाली असली तरीही गडचिरोली जिल्ह्यात मात्र वाढ झाली आहे.

नोव्हेंबर ते जून हा काळ वणव्यांचा हंगामी काळ म्हणून ओळखला जातो. या काळात हजारो छोट्या- मोठ्या आगी दरवर्षी जंगलात लागतात. मार्च महिन्यात वणवे पेटायला लागतात. पानगळतीनंतर शुष्क जंगलांमध्ये लागलेल्या आगी या अधिक प्रखर असतात, तर सदाहरित, अर्धहरित वा समशितोष्ण कटिबंधातील जंगलात लागणारे वणवे हे कमी प्रखर असतात. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने शनिवारी भारतीय वनसर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षात वणव्यांच्या सर्वाधिक घटनांमध्ये उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये २१ हजार ३३, ओडिशात २० हजार ९७३ आणि छत्तीसगडमध्ये १८ हजार ९५० वणव्याची प्रकरणे नोंदवण्यात आली.

हेही वाचा : नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध…

भारतीय वनसर्वेक्षणने देशातील ७०५ संरक्षित क्षेत्रातील जंगलातील आगीची माहिती दिली आहे. त्यावेळी राष्ट्रीय उद्यानांमध्ये वणव्यांची तब्बल सहा हजार ४६ प्रकरणे नोंदवण्यात आली. आंध्रप्रदेश १८ हजार १७५ वणव्यांच्या प्रकरणांसह चौथ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र १६ हजार आठ प्रकरणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान वणवा इशाऱ्याचे सदस्यत्व घेतलेल्या सुमारे नऊ हजार ६७१ लोकांना सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात वणव्यांची सर्वाधिक सात हजार ४२ प्रकरणे नोंदवण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सहा हजार ९३ प्रकरणे होती. तब्बल एक हजारांनी या जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आधीच्या तुलनेत वणव्याच्या घटना कमी झाल्या आहेत. मागील अहवालात १२४६ प्रकरणांची नोंद होती. आत ९६५ वणव्याची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतर रायगड येथे एक हजार १२८ वेळा वणवे लागले. यापूर्वीची नोंद ही एक हजार आठ प्रकरणांची आहे. त्यामुळे या जिल्ह्यात वणव्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात वणव्यांची संख्या वाढली आहे, तर काही जिल्ह्यात ती कमी झाली आहे.

Story img Loader