डचिरोली : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले सरकार किती काळ टिकणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. मात्र, बंडखोर आमदारांकडून निकाल चार ते पाच वर्षे लागणार नाही असा दावा केला जाणे धक्कादायक असून हे लोक आता न्यायालयालाही गृहीत धरत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त गडचिरोलीला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा >>> नाशिक : महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर, खडसेंच्या भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
पाटील पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. पण त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. इतकेच नव्हे तर येथे महापुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली. नागरिक रस्त्यावर आले. अशा परिस्थितीत शिंदेंनी आधी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्याला तरी तत्काळ मदत करायला हवी होती. पण, त्यांना नव्या सरकारची जुळवाजुळव करण्यापासून वेळ मिळत नाही. जाहीर झालेली मदत केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात पूरग्रस्तांना दमडीही मिळालेली नाही. दुसरीकडे त्यांचे सहकारी आमदार चार पाच वर्षे निकाल लागणार नाही. त्यामुळे आमच्या सरकारला धोका नाही, असा दावा करताहेत. राज्यपाल असो की लोकप्रतिनिधी यांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. या सरकारकडून आता कोणती अपेक्षा करावी की नाही हा देखील प्रश्न पडतो अशी टीका त्यांनी केली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> शरद पवारांचं पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठं विधान; म्हणाले, “मी आता…!”
मेडीगड्डा हे भाजपचेच पाप
स्थानिकांचा प्रचंड विरोध असताना देखील महाराष्ट्राच्या सीमेवर मेडीगड्डा सारखे धरण उभारण्यात आले. तत्कालीन भाजप सरकारने त्याला बिनशर्त परवानगी दिली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. याबाबत आम्ही अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला. यावर चर्चा देखील झाली. पुरामुळे उद्ध्वस्त झालेली गावे व नागरिक बघून आमचे मन दुखते मात्र, राज्यकर्त्यांना यात रस नाही, अशी खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.