नक्षलवाद्यांकडून सामान्य आदिवासींना ठार मारण्याच्या घटनांमध्ये यंदा कमालीची वाढ झाली असून, यामुळे नक्षलग्रस्त राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. झारखंड व छत्तीसगडमध्ये या हत्यांचा आकडा सर्वात जास्त आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या साचारात वाढ होत असते. तो आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दले शर्थीचे प्रयत्न करीत असतात. यंदा राज्यातील एकमेव नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांच्या हत्यासत्राने उच्चांक गाठला आहे. गेल्या पाच महिन्यांत नक्षलवाद्यांनी १२ आदिवासींना ठार केले. या सर्वाना पोलिसांचे खबरे ठरवून ठार मारण्यात आले.
याच काळात शेजारच्या छत्तीसगडमध्ये २५ नागरिकांची हत्या नक्षलवाद्यांनी केली, तर झारखंडमध्ये हाच आकडा २८ आहे. एकेकाळी नक्षल साचारात आघाडीवर असलेल्या ओदिशात या वर्षांत तुलनेने साचार कमी असून, तेथे १० हत्या झालेल्या आहेत.
दोन वर्षांंपूर्वी गडचिरोलीत सामान्यांच्या हत्यासत्रात कमालीची घट झाली होती. २०१३-१४ मध्ये नक्षलवाद्यांनी वर्षभरात १४ आदिवासींना ठार केले होते. पोलिसांच्या आक्रमकतेमुळे तेव्हा नक्षलवाद्यांना दहशत पसरवता आली नाही. यंदा मात्र पहिल्या पाच महिन्यांतच नक्षलवाद्यांनी १२ जणांचे बळी घेतले. साचाराचे हे प्रमाण यंदा ५३ टक्क्यांनी वाढले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत नमूद केलेले आहे. याच पाच महिन्यांच्या काळात नक्षलवाद्यांनी तीन पोलिसांना ठार करून त्यांच्या एके ४७ या अद्ययावत बंदुका सुद्धा पळवल्या. या काळात सुरुंग स्फोटाच्या आधारे मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी अनेकदा उधळून लावला असला तरी सामान्यांच्या या हत्यासत्रांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.
हिंसाचारातील वाढ चिंताजनक
गेल्या वर्षी याच काळात संपूर्ण देशभरात नक्षलवाद्यांनी ५३ हत्या घडवून आणल्या होत्या. यंदा हा आकडा ८१ वर पोहोचला आहे. ही वाढ चिंताजनक असल्याचे गृहखात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा