वर्धा : खेडेवजा लहान गावात शिकून पुढे राज्य, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करण्यास सज्ज झालेल्या एका युवतीची ही वाटचाल मनोज्ञ अशीच. घरची पिढीजात गरिबी. कुटुंबाचा मासेमारीचा व्यवसाय. शिक्षण दूरच. पण अंगी असलेली जिद्द सुनयना डोंगरे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सेलूच्या दीपचंद विद्यालयात शिकत असतांनाच काही तरी करून दाखवायचे असा चंग बांधला. क्रीडा क्षेत्रात आवड होतीच. धाव स्पर्धेत सुरवात केली. पदके मिळू लागली आणि उत्साह वाढला. हे क्षेत्र नाव मिळवून देईल, असे वडील विष्णुजी डोंगरे यांनी विश्वास दिला. तर आई अनिता डोंगरेने हिंमत दिली. याच गुणावर मग स्पोर्ट कोट्यातून सुनयनाची निवड पोलीस शिपाई म्हणून वर्धा पोलिसमध्ये झाली. २०११ मध्ये ही निवड झाल्यानंतर त्यांनी ड्युटी करतांनाच खेळण्याचा छंद सोडला नाही.
पुढे या सेवेने आर्थिक विवंचना संपली. विविध पोलीस क्रीडा स्पर्धेत सातत्याने यशस्वी सहभाग नोंदविला. वरिष्ठ अधिकारी पण प्रोत्साहन देत. पण काळाला काही वेगळेच घडवायचे होते. एकदा धावस्पर्धेत पायाला इजा झाली. धावणे सुटले. आता काय, या प्रश्नात बरीच वर्ष गेली. अखेर २०२२ मध्ये एक हटके क्षेत्र निवडण्याचा निर्णय झाला. शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात कामगिरी करण्याचा निर्णय सुनयना यांनी घेतला. जिल्हा पोलीस प्रशिक्षक राजूभाऊ उमरे यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. कठोर परिश्रमांचा हा व्यायाम प्रकार. सोबतच डायट पण चांगले हवे. मात्र आई ताकदीनीशी पुढे आली. मुलीसाठी सामिष व अन्य पोषक आहार देण्याची ती काळजी घेते. पुढे तो क्षण आला. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिला शरीर सौष्ठव स्पर्धेत सुनयनाने सुवर्णपदक पटकावले. वर्धा जिल्हा पोलिस दलाचे नाव महाराष्ट्रात दुमदूमले. याच बळावर मग राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळाले. लखनौ येथे संपन्न या राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सुनयना डोंगरे या द्वितीय स्थानी येत रजत चषकाच्या मानकरी ठरल्यात. हा आयुष्यातील एक अतीव आनंदाचा क्षण ठरला.
हेही वाचा…हत्याकांडांच्या घटनेत गृहमंत्र्यांचे राज्यात शहर तिसऱ्या स्थानावर
सोनेरी क्षण बाकीच होता. १५ दिवसापूर्वी ती सुवार्ता आली. दिल्ली पोलीस मुख्यालयातून फोन आला की पासपोर्ट काढून ठेवा. तयारीला लागा. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे समजले. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सचे आयोजन इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम येथे होत आहे. यावर्षी जून २७ ते ६ जुलै दरम्यान या स्पर्धा होणार. शरीर सौष्ठव विभागात भारतातून सुनयना व राजस्थान पोलिसच्या संजू कुमार या दोघीच त्या स्पर्धेत जाणार. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘ गेम्स ऑफ हिरोज ‘ म्हणून विख्यात आहे. महिला शरीर सौष्ठव स्पर्धा हा प्रकार अद्याप आपल्याकडे रुळलेला नाही. म्हणून सुनायना यांची अफलातून भरारी प्रशन्सेस पात्र ठरत आहे. या प्रकारात त्यांना मुंबईचे प्रशिक्षक सुभाष पुजारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे सुनयना सांगतात.