नागपूर: अयोध्येतील राम मंदिरावरुन काँग्रेसवर केली जात असलेली टीका चुकीची आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनीच अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दरवाचे उघडून श्रीराम दर्शनाची व्यवस्था केली व शिलान्यासही त्यांच्याच काळात झाला. राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही राजीव गांधी यांनी प्रयत्न केले पण राजीव गांधींच्या प्रस्तावाला भाजपने त्यावेळी विरोध केला होता, मग आता मंदीर कुठे बांधत आहेत, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान मानणाऱ्यांना ताकद दिली. जातीच्या व धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजप संविधान व्यवस्था संपवू पाहत असताना महाराष्ट्रातील जनतेने आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचाराला ताकद देण्याचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागत आहे. 

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय परिसरात अपघात पीडितांचा ‘राम नाम जप’, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…

सोलापुरातील विडी घरकुल योजना ही डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारची आहे, या योजनेच्या चाव्या द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. चाव्या देणे एवढीच मोदी गॅरंटी आहे. युपीए सरकारच्या काळातील ही योजना पूर्ण करण्यास मोदी सरकारला १० वर्षे लागली. विडी घरकुलबदद्ल मोदींची गॅरंटी म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी असे खोटे बोलू नये. परवाच मुंबईतील सागरी सेतूच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आले होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान कमी व प्रचारप्रमुख जास्त वाटतात, असा टोलाही पटोले यांनी लगावला. 

हेही वाचा >>>काटेपूर्णा अभयारण्यात हजारो झाडांची कत्तल! उच्च न्यायालयाने वन विभागाला मागितले स्पष्टीकरण

 राहुल गांधींना अटक करुन तर दाखवाच

राहुल गांधी यांना अटक करु, असे आसामचे मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले,ते हुकूमशाहीवृत्तीचे लोक आहेत ते असेच बोलणार. राहुल गांधींना भाजप घाबरते त्यातूनच कारवाईची धमकी दिली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना जरुर अटक करावी. देशाच्या जनतेला न्याय देण्यासाठी राहुल गांधींनी यात्रा काढली आहे, देश त्यांच्यासोबत आहे, भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे म्हणूनच ते घाबरले आहेत. राहुल गांधींवर कारवाई कारवाई करून दाखवा, जनताच त्यांना चोख उत्तर देईल, असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra pradesh congress committee president nana patole question regarding ram temple in ayodhya nagpur rbt 74 amy