यवतमाळ : राज्यातील बेरोजगारी, जातीयवाद, राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांची दुरावस्था यासह विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुण्यातून युवा आक्रोश पदयात्रा काढणार आहे. ही यात्रा मुंबईला गेल्यानंतर विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ‘लालमहल, पुणे ते विधानभवन, मुंबई’ अशी ही पदयात्रा आयोजित केली आहे. ही पदयात्रा १५ ते १९ मार्च या कालावधीत होणार आहे. बुधवार, १९ मार्च रोजी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधानभवनाला घेराव घातला जाणार आहे. या पदयात्रेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व प्रभारी अजय छिकारा, एहसान खान सहभागी होणार आहेत, अशी माहिती यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व प्रमुख नेते टप्प्याटप्प्याने पदयात्रेत सहभागी होणार आहे. शनिवारी, १५ मार्च रोजी पुण्यातील लालमहलपासून पदयात्रेस सुरूवात होईल. यावेळी आमदार तथा विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील व माजी मंत्री विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथालासुद्धा सहभागी होतील, अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस व संघटनप्रमुख श्रीनिवास नालमवार तसेच प्रमोद बगाडे यांनी दिली आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नव्यानेच नियुक्ती झाली आहे. त्या अनुषंगाने युवक काँग्रेसने थेट विधानभवनावर पदयात्रा नेत आंदोलन करण्याचा घेतलेला निर्णय, युवक काँग्रेसला उभारी देणारा ठरेल, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे.

समस्यांवर टाकणार प्रकाश

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांना बगल दिली आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले, मात्र अर्थसंकल्पात तसा कुठलाही निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली नाही. युवकांच्या रोजगारासंदर्भात कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यामातून राज्यात वाढलेली बेरोजगारी, रोजगाराच्या कमी झालेल्या संधी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, राजकीय गुन्हेगारी व गुन्हेगारांना सत्ताधारी राजकीय पक्षांचा आश्रय याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. याशिवाय जातीयवाद, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष यासह विविध विषयावर सरकारला धारेवर धरले जाणार आहे. या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रमोद बगाडे यांनी केले आहे.

Story img Loader