वर्धा : राजकीय भूमिका स्पष्ट करीत एखादा समाज निवडणूकीत सक्रिय होत असतो तेव्हा समाजाच्या पण काही अपेक्षा असतात. महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासंघाने या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून समाजास उमेदवारी म्हणून अपेक्षा व्यक्त केली होती. त्याची दखल प्रमुख पक्षांनी घेतल्याबद्दल समाधान पण व्यक्त केले होते. पण प्रांतिक संघटनेचे अध्यक्ष असलेले माजी खासदार रामदास तडस हे व त्यांचे प्रमुख सहकारी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ झटले, असा दावा ते करतात. त्यामुळे भाजपच्या यशात तेली समाजाचा विदर्भात मोठा वाटा असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. म्हणून समाजाच्या मागण्या भाजप नेत्यांनी त्वरीत मार्गी लावाव्या, अशी भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाने मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले असून त्यात विदर्भातील आमदार सर्वाधिक आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात असलेल्या तेली समाजाने जाहीरपणे भाजपसाठी योगदान दिले. २०१४ नंतर विदर्भातील तेली समाज हा भाजपसोबत जुळल्याने या पक्षाची बांधणी झाली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाने माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात विदर्भातील काही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली होती. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यातील मतदारसंघात तडस यांच्या नेतृत्वात झालेल्या सभा भाजप उमेदवार निवडून येण्यास पूरक ठरल्याचे मत महासंघाचे प्रदेश संघटन सचिव सुधीर चाफले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा…नक्षलवाद्यांची कोंडी; गडचिरोली, छत्तीसगड पोलिसांच्या कारवायांमुळे पुन्हा तेलंगणाकडे धाव!

वर्धा जिल्ह्यात कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस तसेच भाजपने तेली समाजाचा उमेदवार दिला होता. पण फक्त भाजपचा तेली समाजाचाच नव्हे तर चारही उमेदवार आमदार झाले. समाज भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे हे प्रतीक आहे. निवडणूकीपूर्वी समाज संघटनेने संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची केलेली मागणी पूर्ण झाली. आता नव्या सरकारने या महामंडळासाठी ५०० कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा. पूणे जिल्ह्यातील महाराजांच्या समाधी स्थळासाठी विकास आराखडा मंजूर करावा, नवी मुंबईत भूखंड मिळावा, अश्या व अन्य मागण्या संघटनेने नोंदविल्या आहे. त्याची तत्पर अंमलबजावणी करावी, असे संघटनेने स्पष्ट केले. तसेच महासंघाचे अध्यक्ष असलेले माजी खासदार रामदास तडस यांच्या कार्याची दखल घेवून सन्मान करावा. केंद्रात किंवा राज्यात तडस यांना सन्मानजनक जबाबदारी द्यावी, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra provincial tailik federation urges bjp leaders to quickly address societys demands pmd 64 sud 02