नागपूर : मोसमी पाऊस राज्यात वेळेआधीच दाखल झाला, पण नंतर बरसलाच नाही. वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले, पण मोसमी पावसाने त्यांची निराशा केली. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. १ ते ४ ऑगस्ट या चार दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो. एक ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे. या जिल्ह्यांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा : लोकजागर- वैनगंगा ते नळगंगा!
आतापर्यंत ओढ दिलेल्या भागात देखील आता समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. एक ते चार ऑगस्ट पर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. तर पाच ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्र लगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मोसमी पावसाचाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, दिल्ली, हरदोई, देहरी, पुरूलिया, सागर बेट ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यासह राज्यात असलेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे.
हेही वाचा : शिकवणी वर्गांकडून नियमांची पायमल्ली! अधिनियम समितीच्या शिफारशी बासनातच
कोकण विभागात सरासरीपेक्षा ४१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात ४५ टक्के जास्त, मराठवाड्यात २७ टक्के जास्त आणि विदर्भात सरासरीपेक्षा ३६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑगस्टला अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आतापर्यंतही राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.