नागपूर : ग्रामीण भागात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मिळकत (प्रॉपर्टी कार्ड) पत्रिका देण्यात राज्य देशात चौथ्या स्थानावर आहे. देशात आतापर्यंत १ कोटी, २२ लाख ८२ हजार ४८२ मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ही संख्या ८ लाख १६ हजार ८३८ आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (५२,१७,९२०), दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा (२५,९०,४७३), तर तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेश (१७,५८ हजार ७७९) आहे.
ग्रामीण भागातील गावठाणांवरील वस्तीतील भूमालकांना त्यांच्या जमिनीची मिळकत पत्रिका देण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्वामित्व’ योजना सुरू केली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाते. प्रत्येक गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून प्रत्येक जमिनीचे मोजमाप केले जाते. त्याआधारावर मिळकत पत्रिका तयार केली जाते. त्यामुळे भूमालकांना जमिनीची अधिकृत कागदपत्रे प्राप्त होतात व त्या आधारावर ते जमिनीवर कर्ज घेऊ शकतात.
हेही वाचा – नागपूरकरांना शहर सौंदर्यीकरणाचे वावडे? ‘सी-२०’साठी लावलेल्या वस्तूंची चोरी
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, संपूर्ण देशात २२ मार्च २०२३ पर्यंत २ लाख ३६ हजार ६०२ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून यापैकी ७३ हजार ७४९ गावातील १ कोटी २२ लाख ८२ हजार ८८२ भूमालकांच्या मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या. महाराष्ट्राचा विचार करता आतापर्यंत ३५ हजार १६८ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी फक्त ५ हजार ४४१ गावांतील ८ लाख १६ हजार ८३८ भूमालकांच्या मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या. सर्वेक्षणाच्या तुलनेत मिळकत पत्रिका तयार झालेल्या गावांची संख्या महाराष्ट्रात कमी आहे. कागदपत्रे किंवा जमिनीचे दस्ताऐवज उपलब्ध नसणे हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते.