नागपूर : राज्यातील बऱ्याच भागात तापमान वाढल्याने उष्माघाताशी संबंधित रुग्ण वाढत आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात असून राज्यातील रुग्णसंख्या एप्रिल महिन्यातच ४९ रुग्णांवर पोहचली आहे. दरम्यान उष्माघात म्हणजे काय? आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे किती रुग्ण आढळले? याबाबत आपण जाणून घेऊ या.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ मार्च ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान उष्माघाताचे ४९ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक ९ रुग्ण नागपूर ग्रामीणचे आहेत. नागपूर शहरात मात्र एकाही रुग्णाची नोंद नाही. नागपूर महापालिकेकडे उष्माघाताचे तीन संशयित मृत्यू नोंदवले गेले असतानाही रुग्णाची नोंद नसल्याने या नोंदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बुलढाण्यात ७ रुग्ण, औरंगाबाद १, गडचिरोली ४, जालना ५, कोल्हापूर २, लातूर २, नांदेड १, नाशिक २, उस्मानाबाद १, पालघर २, परभणी ५, पुणे १, रायगड २, सांगली १, ठाणे १, वर्धा २, वाशीम १ तर यवतमाळातही १ रुग्ण नोंदवला गेला आहे. या आकडेवारीला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यामध्ये उष्णता आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थापित करण्याची क्षमता कमी करते. लक्षणांमध्ये चक्कर येणे, मूर्च्छा येणे, अंधुक दृष्टी, अस्पष्ट बोलणे आणि गोंधळ यांचा समावेश होतो. उष्माघातामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि महत्वाच्या अवयवांना नुकसान होते.
उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक…
उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा, तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका, वेळोवेळी पाणी पीत रहा, तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा,
घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट – चपला वापरा, अल्कोहोल, चहा – कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही पेयं टाळा, प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका, जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी – छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा, पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं – पाळीव प्राण्यांना सोडू नका,
तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा, ओआरएस, लस्सी, तोरणी (तांदळाचं पाणी), लिंबू सरबत, ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील, घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा. पंखे, ओला नॅपकीन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावे.