नागपूर : महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात तब्बल आठ वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. चंद्रपूर आणि नागपूर वनविभागातील हे मृत्यू आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था आणि वनविभागाने केलेल्या व्याघ्रगणनेत भारतातील वाघांची संख्या वाढली आहे.
हेही वाचा >>> दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई
महाराष्ट्रातही ४४४ वाघ असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. मात्र, याचवेळी राज्यात गेल्या चार वर्षात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यात वाघांच्या बछड्यांच्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. या आठ बछड्यांपैकी पाच बछड्यांचा मृत्यू हे सप्टेंबर महिन्यातील आहेत. यात चंद्रपूरच्या चार, ब्रम्हपूरीच्या एक आणि पेंच व्याघ्रप्रकल्पातील तीन बछड्यांचा समावेश आहे. साधारणपणे बछड्यांच्या मृत्युमागे नैसर्गिक कारण अधिक असले तरीही यात वाघिणीपासून दूरावल्याने हे बछडे मृत पावले आहेत. चंद्रपूर व पेंचमधील वाघांच्या बछड्यांच्या मृत्युमागेही नेमके हेच कारण आहे. अजूनही या बछड्यांच्या आईचा शोध लागलेला नाही.