नागपूर : राज्यातील सण-उत्सव, सामाजिक आंदोलने किंवा मोर्चांमध्ये तरुणी आणि महिलांची लक्षणिय संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राज्य राखीव पोलीस दलात महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र, गृहमंत्रालयाच्या नकारात्मक धोरणामुळे राज्याला अजुनही पहिल्या महिला बटालीयनची प्रतीक्षाच आहे.
राज्यात विविध ठिकाणी दंगलसदृष्य स्थितीत किंवा संवेदनशिल प्रकरणात राज्य राखीव दलाचे जवान (एसआरपीएफ) तैनात करण्यात येतात. मात्र, अनेकदा आंदोलनात महिला व तरुणींचा समावेश असतो. त्यामुळे जवानांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच तरुणी आणि महिलांवर कारवाई करण्यासाठी महिला जवान राज्य राखीव दलात तैनात नाहीत. त्यामुळे राज्यातील बिकट परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी एसआरपीएफमध्ये महिला पोलीस असावेत, यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पहिले महिला बटालियन स्थापन करण्याची चार वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती.
हेही वाचा : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात चोवीस तासांत तीन हत्याकांड; अखेर ‘त्या’ जखमीचाही मृत्यू
१३८४ महिला पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी काटोल येथील १०० एकर जमीनही उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक टप्प्यात ४६१ महिला या प्रमाणे तीन टप्प्यात ही तुकडी तयार करण्यात येणार होती. मात्र, चार वर्षांपासून हा प्रस्ताव गृहमंत्रालयात प्रलंबित आहे. अद्यापही महिला बटालीयन स्थापन करण्यासाठी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयाकडून कोणत्याही हालचाली नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्य न दाखवल्यामुळे महिला बटालियनचा प्रस्ताव अद्यापही रखडला आहे. गृहमंत्रालयाच्या नकारात्मक आणि दुर्लक्षित धोरणामुळे आतापर्यंत एसआरपीएफमध्ये एकाही महिला पोलीस कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे चार वर्षांपासून राज्याला महिला बटालियनची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
काटोलची निवड नडली
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे महिला बटालियनची सुरुवात होणार होती. भौगोलिक परिस्थिती, रेल्वेसेवा, विमानसेवा आणि राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे दळणवळणाची सुविधा लक्षात घेऊन काटोलची निवड करण्यात आली होती. मात्र, माजी गृहमंत्र्यांचे गाव आणि राजकीय वलय लक्षात घेता काटोलची निवड नडल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : VIDEO : ‘आर्ची’ कुटुंबकबिल्यासह दिसताच पर्यटक सैराट, टिपेश्वरच्या जंगलात झिंग झिंग झिंगाट!!!
“महिला बटालियनचा गृहमंत्रालयात प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसांत राज्यात १७ हजार पोलीस भरती होईल. त्यावेळी एसआरपीएफमध्येसुद्धा महिला पोलिसांची नियुक्ती होईल. त्यामुळे लवकरच नागपुरातच महिला बटालीयन सज्ज होईल.” – चिरंजीव प्रसाद, अप्पर पोलीस महासंचालक, एसआरपीएफ