नागपूर : विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी झाला. फडणवीस मंत्रिमंडळात विविध जातीजमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता. हे तीन व आजचे ३९ असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान ४२ झाले आहे. कायद्यानुसार ४३ मंत्रिपदांची तरतूद असल्याने एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले याची नंतर कुजबुज सुरू झाली. मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक, बिगर मराठी अशा सर्व जातीजमातींचा समतोल राखण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल राखण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अॅड. आशीष शेलार, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, अतुल सावे, शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, अनिल पाटील आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा >>>मंत्र्यांची ओळख : चंद्रशेखर बावनकुळे, इंद्रनील नाईक, ॲड. आशिष जयस्वाल
बावनकुळे चौथ्या क्रमांकाचे मंत्री
बावनकुळे यांना शपथविधीमध्ये प्रथम म्हणजे मंत्रिमंडळात चौथ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. फडणवीस यांच्या २०१४-१९ या कारकीर्दीत सुरुवातीला एकनाथ खडसे व नंतर चंद्रकांत पाटील यांना फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले होते. बावनकुळे यांच्यानंतर राधाकृष्ण विखेपाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन अशा क्रमाने मंत्र्यांनी शपथ घेतली.
सरकारमधील नवे चेहरे
●भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांना वगळून शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, नितेश राणे, या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
●शिवसेनेने दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या नेत्यांना भाजपच्या आक्षेपामुळे वगळले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा संधी दिली नाही.
●नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भारणे, मकरंद पाटील यांना अजित पवार यांनी संधी दिली.
केवळ चार महिलांना संधी
●फडणवीस मंत्रीमंडळात केवळ चार महिलांना स्थान मिळू शकले आहे.
●पंकजा मुंडे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर व पुण्यातील माधुरी मिसाळ या तीनही भाजपच्या महिला आमदार आहेत.
●आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री आदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे.
●शिवसेनेने एकाही महिलेला मंत्रीपद दिलेले नाही.