नागपूर : राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत गिरड सहवनक्षेत्रात समुद्रपूर-गिरड महामार्गावर धोंडगावजवळ पहाटेच्या सुमारास जड वाहनाच्या धडकेत चार महिन्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला. तर पेंच व्याघ्रप्रकल्पातदेखील पश्चिम पेंचमध्ये नागलवाडी येथे आणखी एका वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली. मृत वाघ जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत असल्याने पेंच प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या पहिल्या २२ दिवसात ११ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यातील दोन वाघांची शिकार झाली. दोन बछडे उपासमारीने मृत पावले आहेत. दोन वाघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. दोन वाघ रेल्वे आणि रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. रेल्वे अपघातात वाघाचा मृत्यू होऊन काही तास उमटत नाही तोच रस्ते अपघातात देखील वाघ मृत्युमुखी पडला आहे. वाघांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असून यातील बरेच मृत्यू हे वनक्षेत्राच्या बाहेर आहेत. वाघांच्या शिकारीचा धोका या मृत्यूतून समोर आला आहेच, पण वनक्षेत्राबाहेरील व्यवस्थापनात खाते कमी पडत असल्याचेही यातून दिसून आले आहे. मृतदेह कुजल्यानंतर वाघाचे मृत्यू समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या खात्याची क्षेत्रीय स्तरावरील पकड कमी होत असल्याचे देखील या मृत्युसत्राने स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्त अधिकारी आणि वाघांच्या कॉरिडॉर, त्यांच्या संवर्धनावर काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमींनी देखील ही खंत बोलून दाखवली.

हेही वाचा – तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा

शमन उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

जंगलालगतच्या रेषीय प्रकल्पांवर घेतल्या जाणाऱ्या शमन उपाययोजनांमध्ये वनखात्यासह संबंधित सर्वच खाते कमी पडत आहे. ज्याठिकाणी शमन उपाययोजना केल्या जात आहेत, त्या ज्या पद्धतीने असायला हव्या, तशा होत नाहीत. ठराव होऊन देखील जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती कमी होण्याऐवजी जास्त असते. रेल्वे रुळाच्या बाजूला प्रवाश्यांकडून खाद्यपदार्थांच्या पिशव्या, उरलेले खाद्यपदार्थ टाकतात आणि वन्यजीव त्याकडे आकर्षित होतात आणि रेल्वेखाली येऊन त्यांचा मृत्यू होतो. – उदयन पाटील, सृष्टी पर्यावरण मंडळ

वाघ कॉरिडॉर सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित

वाघांच्या कॉरिडॉरची सुरक्षा हा मुद्दा आपल्याकडे अजूनही दुर्लक्षित केला जात आहे. प्रकल्प आणि इतर कारणांमुळे कॉरिडॉरचे जाळे तुटत चालले आहेत. तर रेषीय प्रकल्पांवरील शमन उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. ताडोबा परिसरात राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघांना किंमत मोजावी लागत आहे. – मिलिंद परिवक्कम, रोडकिल्स इंडिया सिटीझन सायन्स कॅम्पेन

हेही वाचा – सलग ४०१ तास संगीत मैफिल! अमरावतीत असाही आगळावेगळा विक्रम…

व्याघ्रसंवर्धनापेक्षा पर्यटनाला जास्त महत्त्व

वनखात्यात अलीकडच्या काही वर्षात वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली तांत्रिक क्षमतेवर अधिक भर देण्यात येत आहे. तर प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणे कमी झाले आहे. खाते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहेच, पण त्यामुळे वन्यजीव संवर्धन होत नाही. त्यासाठी क्षेत्रीय कामावर अधिक भर राहिला पाहिजे. मात्र, खात्यात व्याघ्रसंवर्धनापेक्षा ‘पर्यटन’ जास्त महत्त्वाचे झाले आहे. – किशोर मिश्रीकोटकर, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी

Story img Loader