नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे लवकरच एक कंपनी स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी ‘चक्र’ प्रकल्पावर काम सुरू केले जाणार आहे. १०० कोटींच्या या प्रकल्पाचे मुख्यालय नाशिकला असेल. सोबतच इतरत्र १० उपकेंद्र असतील.
या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपये मिळतील. लवकरच मुंबईत वैद्यकीय सचिव, अधिष्ठात्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी नागपुरात दिली.
हेही वाचा…बुलढाणा: पत्नीला न वाचवता झोपी गेलेल्या पतीला तीन वर्षांची शिक्षा
प्रकल्पासाठी संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पावर आरोग्य विद्यापीठाचे नियंत्रण राहणार नाही. प्रकल्पाचे मुख्यालय नाशिकला असेल. पहिल्या टप्प्यातील पाच उपकेंद्र नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, चंद्रपुरात असतील. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच उपकेंद्रांची त्यात भर पडेल. हे उपकेंद्र संबंधित जिल्हा, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासोबत मिळून काम करतील. प्रत्येक केंद्रात एका विषयावर संशोधन होईल. त्यानुसार नागपुरातील केंद्रात आदिवासींमधील आजार, चंद्रपूरला कर्करोग, मुंबईतील जेजे महाविद्यालयातील केंद्रात डेटा सेंटरवर संशोधन, पुण्याच्या केंद्रात माता व बालकांवरील संशोधन होईल. या केंद्रात वैद्यकीय चाचण्यांसाठीही विशेष शाखा कार्यरत राहणार असल्याचेही डॉ. कानिटकर यांनी सांगितले. या संशोधनासाठी कंपनीला सामाजिक दायित्व निधी, शासनाकडून अनुदानासह इतरही अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. संजीव चौधरी उपस्थित होते.
एम्ससोबत सामंजस्य करार
नागपूर एम्ससोबतही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आदिवासींवरील संशोधनासाठी एक सामंजस्य करार करीत आहे. त्यामुळे एम्सही आदिवासींवरील आजाराशी संबंधित संशोधनात सहभागी होणार असल्याचे डॉ. कानिटकर यांनी सांगितले.
हेही वाचा…बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षांची शिक्षा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबाबत
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८ ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षण, संशोधन, क्रीडा, प्रात्यक्षिक, कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यापीठाकडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूनही नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. नागपूर विभागातील आदिवासींच्या आजारावरील ब्लॉसम हा प्रकल्पही त्यापैकी एक आहे. हा प्रकल्प विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून नागपूरचे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांच्या नेतृत्वात राबवला गेला.