नागपूरमध्ये आनंदाचे वातावरण
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांना नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी)े कुलपती म्हणून नियुक्त केले आहे. न्या. बोबडे यांची नियुक्ती नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्रात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची घोषणा झाल्यानंतर ती कुठे बनविण्यात यावी, यावरून रस्सीखेच झाली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे हे विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागपुरातील विधि विद्यापीठाच्या निर्मितीसाठी जागेचा शोध सुरू झाला. त्यानंतर ११ जानेवारीला नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदासाठी प्रा. भवानी प्रसाद पांडा यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आज सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलपतीपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.बी.एन. श्रीकृष्ण आणि नागपुरातील राष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपतीपदी नागपूरचे न्या. शरद बोबडे यांची नियुक्ती केली. न्या. बोबडे हे नागपूरचेच आहेत. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ ला नागपुरात झाला. त्यांचे वडील अरविंद बोबडे हे ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. न्या. शरद बोबडे यांचे शालेय शिक्षण नागपुरातच झाले. त्यांनी १९७८ साली नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी संपादन केली. त्यानंतर नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. १९९८ साली त्यांना वरिष्ठ अधिवक्तापद बहाल करण्यात आले. २००० ला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ ला ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यानंतर १२ एप्रिल २०१३ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नागपुरातील राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा कुलपती होणे ही नागपूरकरांसाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूरच्या विधिज्ञ क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
जूनमध्ये सुरू होणार विद्यापीठ
कुलपती आणि कुलगुरूंची निवड झाली असून जून २०१६ ला विद्यापीठ कार्यान्वित होणार असल्याची माहिती आहे. प्रभारी कुलगुरू प्रा. पांडा यांनी १६ आणि १८ जानेवारीला नागपूरला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरुवातीला नागपूरच्या राष्ट्रीय विधि विद्यापीठात साठ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

Story img Loader