अमरावती : जिल्‍ह्यातील आठपैकी सात जागांवर महायुतीने विजय संपादन करून जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. आता नव्‍या सरकारमध्‍ये महायुतीमधून मंत्रिपदासाठी तीन जणांची दावेदारी पुढे आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्‍या सुलभा खोडके, युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि भाजपचे प्रताप अडसड यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्‍ह्यातील काँग्रेसचे वर्चस्‍व उध्‍वस्‍त करीत महायुतीच्‍या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. धामणगाव रेल्‍वे, तिवसा, अचलपूर, मेळघाट आणि मोर्शी या पाच मतदारसंघांत भाजपने तर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि बडनेरात युवा स्‍वाभिमान पक्षाने यश मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी राणा हे चौथ्‍यांदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपने त्‍यांना बळ दिले असले, तरी त्‍यांनी अमरावती आणि दर्यापूरमध्‍ये महायुतीच्‍या धर्माचे पालन केले नाही, अशी टीका त्‍यांच्‍यावर झाली. अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवार सुलभा खोडके यांना पाठिंबा देण्‍याऐवजी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांचा प्रचार केला. खोडके आणि राणा दाम्‍पत्‍यातील राजकीय संघर्ष जुना असला, तरी आता दोघेही महायुतीचे घटक आहेत. त्‍यामुळे मंत्रिपदाच्‍या शर्यतीत देखील या संघर्षाचे प्रतिबिंब झळकेल, असे संकेत आहेत.

हेही वाचा : भंडारा : नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द, शिवीगाळ; व्हायरल ऑडियो क्लिपने खळबळ

लोकसभा निवडणुकीत विरोध केला, हे कारण पुढे करून राणा दाम्‍पत्‍याने अमरावतीत खोडके यांच्‍या तर दर्यापुरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात भूमिका घेतली. त्‍यावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राणा यांना समजही दिली होती. पण, त्‍यांनी विरोधी भूमिका कायम ठेवली. राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्‍या निकटचे समजले जातात, त्‍यामुळे मंत्रिपदाच्‍या शर्यतीत त्‍यांचे नाव पुढे आहे.

हेही वाचा : नागपूर: अपघातात जखमी विद्यार्थ्याला तातडीने शस्त्रक्रियेसाठी हलवले…४८ विद्यार्थ्यांची…

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके हे अजित पवारांच्‍या निकटचे. पक्षाची निवडणुकीतील व्‍यूहरचना आणि धोरणात्‍मक निर्णयात त्‍यांच्‍या शब्‍दाला किंमत दिली जाते, त्‍यामुळे सुलभा खोडके यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी अजित पवार समर्थक आग्रही आहेत. भाजपचे प्रताप अडसड हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गेल्‍या निवडणुकीत ते जिल्‍ह्यात निवडून आलेले भाजपचे एकमेव आमदार होते. त्‍यांनाही मंत्रिपदाची आस आहे. मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २००९ मध्ये केवलराम काळे काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार बनले होते. मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे आणि तिवसाचे आमदार राजेश वानखडे हे प्रथमच निवडून आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 amravati mla ravi rana mla sulbha khodke mla pratap adsad competition to become minister mma 73 css