अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी अमरावती, बडनेरा हे शहरी मतदार संघ सोडले, तर उर्वरित सहा मतदार संघ ग्रामीण भागाशी जोडलेले असून मेळघाट, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर या भौगोलिकदृष्टया मोठ्या असलेल्या मतदार संघांमध्ये उमेदवारांना पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.

दिवाळीच्‍या सणादरम्‍यान मतदारांशी संपर्क साधणे उमेदवारांसाठी अडचणीचे बनले आहे. प्रचारासाठी कार्यकर्त्‍यांची जमवाजमव हेही जिकरीचे काम ठरत आहे. लोक सण-उत्‍सवात व्‍यस्‍त असताना प्रचारासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागत असताना अनेकांचा भर हा समाजमाध्‍यमांवरच आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदार संघ हे दोन ते तीन तालुक्यांनी मिळून बनले आहेत. तिवसा मतदार संघात तर चार तालुक्यांचा समावेश आहे. मेळघाट हा भौगोलिकदृष्टया सर्वात मोठा मतदार संघ आहे. बहुसंख्य भाग दुर्गम खेड्यांनी व्यापला आहे. या मतदार संघाचा परीघ १०५ कि.मी. पेक्षा अधिक आहे. धारणी तालुक्यातील मध्यप्रदेशची सीमा ते परतवाड्यानजीक सातपुड्याच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या या मतदार संघात प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे हे सर्वच उमेदवारांसाठी जिकरीचे काम असते. धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांसह अचलपूर तालुक्यातील काही भागाचा समावेश या मतदार संघात आहे.

हेही वाचा >>> मेळघाटात भाजपमध्‍ये बंडखोरी…. माजी आमदाराची रिंगणात उडी….

मेळघाटपाठोपाठ अधिक विस्तारलेला मतदार संघ हा धामणगाव रेल्वे आहे. चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांचा या मतदार संघात समावेश आहे. या तीन तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवणे हे प्रत्येक उमेदवारांसाठी आव्हानात्मक बाब बनली आहे.

संपूर्णपणे ग्रामीण तिवसा मतदार संघात तिवसा, अमरावती, भातकुली आणि मोर्शी तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. हा मतदार संघ देखील भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आहे.

हेही वाचा >>> ‘लाडक्या भावां’ची दिवाळी अंधारातच!

दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर तालुक्याचा काही भाग मिळून बनलेल्या दर्यापूर मतदार संघातही उमेदवारांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. अचलपूर मतदार संघांमध्येही उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधताना धावपळ करावी लागणार आहे. चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्याचा समावेश असलेल्या या मतदार संघात अचलपूर आणि चांदूर बाजार ही दोन शहरे देखील आहेत. मोर्शी आणि वरूड या दोन तालुक्यांच्या मोर्शी मतदार संघात फिरणे मेळघाटपेक्षा सोपे आहे. अमरावती हा पूर्णपणे शहरी मतदार संघ आहे. बडनेरा मतदार संघात अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभागांसह भातकुली तालुक्यातील काही भागाचाही समावेश आहे. शहरी भागात पदयात्रांवर उमेदवारांचा भर आहे.