एका कराराच्या भरवशावर महाराष्ट्रात सामील झालेला विदर्भ प्रदेश तसा मोठा. स्वतंत्र राज्य होऊ शकेल अशी क्षमता असलेला. त्यामुळे प्रादेशिक पक्ष फुलण्याला येथे भरपूर वाव. राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीला वा दुर्लक्षाला कंटाळून असे पक्ष स्थापण्याचे अनेक प्रयत्न विदर्भात झाले. त्यांना यश किती मिळाले व अपयशाचे धनी का व्हावे लागले हा आजच्या चर्चेचा विषय. त्याचे कारण नुकतेच लागलेले विधानसभेचे निकाल व त्यात या साऱ्या प्रादेशिकांची उडालेली धुळधाण. कुठलेही राज्य एक असले तर त्यात सामावलेल्या प्रदेशाची अस्मिता, भाषा, व्यवहार यात वेगळेपण असते. केवळ प्रदेशाचा विचार करत उभे राहणारे पक्ष याच बळावर मोठे होतात. हे लक्षात घेतले तर विदर्भ तशी सुपीक भूमी. तरीही हे पक्ष का तग धरू शकले नाहीत? यात नेमकी चूक कुणाची? या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्यांची की त्यांच्यावर कधी विश्वास तर कधी अविश्वास टाकणाऱ्या जनतेची? यावर विचार होणे गरजेचे.

यावेळच्या निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची कामगिरी शून्य राहिली. विदर्भातून सुरुवात होत नंतर राज्यस्तरावर स्थिरावलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची अवस्था वाईट झाली. युवा स्वाभिमानचे रवी राणा एकटेच निवडून आले. हे झाले पक्षांच्या बाबतीत. विदर्भात काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांपासून अंतर राखून स्वतंत्र प्रज्ञेने राजकारण करणारे अनेक नेते आहेत. तेही अपयशी ठरले. यातले मोठे उदाहरण म्हणजे वामनराव चटप. या साऱ्यांच्या पराभवाची चिकित्सा करण्याआधी थोडे इतिहासाकडे वळूयात. त्यावर नजर टाकली की असे एकखांबी नेतृत्व असलेल्या पक्षांची स्थिती नंतर नंतर दयनीय का होत जाते या प्रश्नाचा उलगडा होतो. यातले ठळक नाव म्हणजे जांबुवंतराव धोटे. स्वतंत्र राज्याची मागणी समोर करत विदर्भावर अधिराज्य गाजवले ते या नेत्याने. आधी आंदोलन व नंतर पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या व त्यात यश मिळवले. धोटेंची जादू विदर्भावर दीर्घकाळ चालली. त्यांचा शब्द तेव्हा प्रमाण समजला जायचा. नंतर सत्तेच्या मोहात ते काँग्रेसच्या वळचणीला गेले व त्यांच्या पक्षाची उतरती कळा सुरू झाली. हे ऱ्हासपर्व नंतर इतके वाढले की त्यांचा पक्ष कधी संपला हे कुणालाच कळले नाही. कोणताही राष्ट्रीय पक्ष अशा प्रादेशिक पक्षांचा घास गिळंकृत करतो. काँग्रेसनेही तेच केले. नंतर जांबुवंतराव केवळ नेते राहिले.

हेही वाचा : नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…

नंतर नाव येते ते अहेरीचे राजे विश्वेश्वरराव यांचे. त्यांनी नागविदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून अनेक निवडणुका लढवल्या. सुरुवातीला त्यांना यश मिळत गेले. लोकसभा व विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले. हयात असेपर्यंत त्यांनी स्वत:चा पक्ष कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधला नाही हे उल्लेखनीय. त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांचे पुत्र सत्यवान यांना फार यश मिळाले नाही. नंतर त्यांचे पुत्र अंबरीशराव यांनी थेट भाजपचा रस्ता धरला व नाविसचे अस्तित्व संपले. वामनराव चटप व ॲड. मोरेश्वर टेंभूर्डे हे दोघे शेतकरी नेते म्हणून संपूर्ण विदर्भाला परिचित. मोठ्या पक्षांना जवळ न घेता त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्व सिद्ध केले. नंतर शरद जोशींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाकडून अनेक निवडणुका लढवल्या. त्यात दोघांनाही यश आले पण मोजके. जोशींचा करिष्मा संपल्यावर ॲड. टेंभूर्डे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले व केवळ नेते म्हणून राहिले. चटपांनी कोणताही पक्ष जवळ न करता मिवडणुका लढवणे सुरूच ठेवले पण ते दीर्घकाळ यश मिळवू शकले नाही. यावेळी ते कडूंच्या परिवर्तन आघाडीत होते. तीही त्यांना विजयाजवळ नेऊ शकली नाही. गोवारी समाजाचे नेते डॉ. रमेश गजबे यांचेही असेच झाले. केवळ एकदा स्वतंत्रपणे विजय मिळवणाऱ्या गजबेंनी नंतर अनेक पक्ष जवळ केले पण यशापासून वंचित राहिले. सध्या भाजपचे खासदार असलेले डॉ. अनिल बोंडे यांनीही एक पक्ष काढला व मोर्शीतून विजयी झाले. नंतर हळूच त्याचे विसर्जन करून ते भाजपत सामील झाले. या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानात म्हणजे अलीकडच्या पंधरा वर्षात काय घडले तेही बघू. यात अग्रक्रमावर नाव येते ते प्रकाश आंबेडकरांचे. त्यांनी भारिप बहुजन महासंघ काढला. त्या माध्यमातून उल्लेखनीय यश मिळवले. पक्षाला केवळ विदर्भापुरते न ठेवता राज्यव्यापी केले. नंतर त्यांनी वंचितचा प्रयोग केला. त्यांच्या या प्रयत्नांची चर्चा भरपूर झाली पण त्यांचा उद्देश पक्षाला आमदार मिळवून देण्यापेक्षा काँग्रेसला पराभूत करणे हाच हे जसे स्पष्ट होऊ लागले तशी त्यांची जादू ओसरू लागली. यावेळी त्यांना खातेही उघडता आले नाही. स्वत:च्या यशापेक्षा दुसऱ्याच्या अपयशाने आनंदी होणारे आंबेडकर बहुधा राजकारणातील एकमेव नेते असावेत. राजकारणात स्वत:ची रेषा मोठी करण्याला महत्त्व असते. आंबेडकरांचा बहुतांश काळ दुसऱ्याच्या रेषा कशा पुसता येईल यातच गेला. आताही ते महाविकास आघाडीला कसा झटका दिला याच आनंदात वावरताना दिसतात.

हेही वाचा : प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला

आता बच्चू कडूंचे बघू. राजकारणातील अतिशय आश्वासक व जनतेला विश्वास बसेल असा चेहरा म्हणून ते उदयाला आले. प्रहार हा त्यांचा पक्ष याच बळावर मोठा झाला. शेतकरी, शेतमजूर, अपंग यांचे प्रश्न मांडणारे कडू सातत्याने यश मिळवत गेले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी दोन आमदार निवडून आणले. त्यांच्या पक्षाचा प्रवास आणखी वेगाने होईल या अपेक्षेत अनेकजण होते. नंतर त्यांना सत्तेची चटक लागली. यामुळे त्यांच्यातला आंदोलक हळूहळू मृतप्राय होत गेला. कधीकाळी धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा पुरस्कार करणारे कडू आधी आघाडी व नंतर युतीच्या जवळ गेले. या जवळिकीने त्यांच्या पक्षाचे मातेरे होणार हे दिसत होते. कदाचित हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारला. ही आघाडी युतीला मदत करण्यासाठी असाही ठपका त्यांच्यावर आला. यामुळे या निवडणुकीत त्यांचा पक्ष व आघाडी पार भुईसपाट झाली. जांबुवंतरावानंतर दीर्घकाळ प्रादेशिक पक्षाचे राजकारण यशस्वी करून दाखवणारे कडू विदर्भातले दुसरे. आता ते पुन्हा उभारी घेतील का हा कळीचा प्रश्न. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेले रवी तुपकर यांचाही चेहरा आश्वासक. मूळचे शेतकरी संघटनेचे. जनतेच्या प्रश्नावर लढा देणारे म्हणून त्यांची ख्याती. त्यांनी आता कुठे राजू शेट्टींची साथ सोडली. लोकसभेत त्यांच्यामुळे युतीला फायदा मिळाला. आता ते नव्या पक्षाच्या माध्यमातून काय करतात हे येत्या काळात दिसेल. आमदार झालेले रवी राणा यांचा पक्ष पुढील निवडणुकीत दिसणार नाही याची व्यवस्था भाजपकडून केली जाईल. तात्पर्य हेच की विदर्भातील या नेत्यांनी जोवर स्वतंत्रपणे राजकारण केले तोवर त्यांना यश मिळाले. कुणाची तरी वळचणी गाठताच अपयश. त्यामुळे भविष्यात राजकीय इतिहास चाळताना यांच्या यशापेक्षा अपयशाचीच चर्चा अधिक होईल हे नक्की!

Story img Loader