वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता आर्वी मतदारसंघात आज केली. ते म्हणाले, की २२ जिल्ह्यात ६४ प्रचारसभा आटोपून आर्वीत आलो आहे. आपल्या भाषणातून त्यांनी प्रामुख्याने महिलांच्या योजनांना उजाळा दिला. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी विविध चौदा योजना महिलांच्या कल्याणासाठी सुरू केल्या. महाराष्ट्रात ११ लखपती दिदी तयार केल्या. २०२८ पर्यंत ५० लाख तयार होतील. आर्वी मतदारसंघात सुमित वानखेडे हे २५ हजार लखपती महिला करणार. मुलगी जन्माला आली की त्याचे स्वागत झाले पाहिजे, या भावनेने काम केले. म्हणून लाडकी लेक सुरू केली.
हेही वाचा >>> आंबेडकरी चळवळी विरोधात षडयंत्र, प्रस्थापितांनी गटातटात अडकवले, ‘हा’ युवा नेता म्हणतो,‘ आपल्या ताटात काहीच…’
उच्च शिक्षण महागडे आहे. म्हणून मुलींना शिकवल्या जात नाही. आईवडिलांना सांगितले चिंता करू नका. मुलीचे मामा मुंबईत मंत्रालयात बसले आहे. ते मामा यासाठी खर्च करतील. आता उच्च शिक्षणात मुलींचा खर्च राज्य सरकार करीत आहे. शंभरटक्के फी सरकार भरते. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अधिकारी वर्गाने विरोध केला. आता तेच अधिकारी म्हणतात की योजना सुरू ठेवा. एसटी फायद्यात आहे. लाडकी बहिण योजना सुरू केली तेव्हा नाना पटोले यांचे सचिव विरोधात कोर्टात गेले. पैशांचाा चुराडा होईल असे म्हटले. आम्ही कोर्टाला उत्तर दिले. योजना सुरू राहली. आम्ही सख्खे भाऊ म्हणून हे केले. गावातील सावत्र भाऊ विरोध करतात. आम्ही या अडीच कोटी बहिणींच्या खात्यात पैसेही जमा केले. राज्यात सरकार आले तर १५०० नव्हे तर २१०० रूपये देवू. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अश्या प्रत्येक घटकांसाठी मदत दिली आहे, असे फडणवीस यांनी आपल्या भाषणातून नमूद केले.
हेही वाचा >>> दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी
खासदार काळे यांना टोला लगावतांना ते म्हणाले की २०१४ ते २०१९ या काळात ते आमदार असतांना एकदाही मंत्रालयात फिरकले नाही. मंत्रालयाच्या कुठल्या टेबलावर जावं लागत, हे त्यांना माहीत नाही. माहित असण्याच कारण नाही. कारण निवडून येण्या करीता काम कराव लागतं, हे त्यांना माहितच नाही. त्यांना माहित होत, माझ्या घराण्याची सत्ता आहे. भोळीभाबडी जनता मलाच निवडून देणार. काम केल नाही तरी चालते. त्यांचा भ्रम २०१९ मध्ये केचे यांनी दूर केला. पक्षाने नवीन रक्ताला, शेतकऱ्याच्या मुलाला वाव देण्याचा निर्णय घेतला. म्हणून सुमित वानखेडे या सामान्य कुटुंबातील तरूणास उमेदवारी दिली. सुमित कामाला वाघ आहे. तो बोलतो कमी आणि काम अधिक करतो. केलेल्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्याच्याकडे कसब आहे. म्हणून जे केले तेच त्याने आज वाचून दाखविले. त्यांना निवडून द्या आणि आर्वीचा कायापालट करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी समारोप करतांना केले. सुमित वानखेडे यांनी आपल्या भाषणातून खासदार काळे यांनी केलेल्या आराेपांचा समाचार घेतला. ते म्हणाले की माझ्या पत्रकातील केवळ दोन कामांवर त्यांचा आक्षेप आहे. म्हणजेच उर्वरीत ४३ कामे ते मान्य करतात. या दोन कामांचादेखील मीच पाठपुरावा करीत निधी मंजूर करून आणला, असे वानखेडे यांनी कामाच्या आदेशाचा कागद दाखवून जाहीर केले. यावेळी दादाराव केचे यांनी आपल्या भाषणातून गत चार वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा मांडला. सुधीर दिवे, रामदास तडस व अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
© IE Online Media Services (P) Ltd