नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या वाटाघाटीत पूर्व नागपुरात विधानसभा मतदारसंघ मिळवण्यात यश मिळवले, परंतु त्या जागेवर भाजपशी दोन हात करताना महाविकास आघाडीतील घटकपक्षांची मनधरणीसोबतच बंडखोरांचाही सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्व नागपूर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासाठी गुरुवारी प्रचारसभा घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट दिसून आली. परंतु प्रत्यक्षात पेठे यांना एकट्याने किल्ला लढवायचा आहे. त्यासाठी कारणे देखील तशीच आहेत. काँग्रेस पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाकयुद्ध देखील रंगले होते. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत राष्ट्रवादीला हिंगण्यासोबतच पूर्व नागपूरही मिळाले. त्यातूनच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी ७९ हजार ९७५ मते घेतली होती. तर भाजपचे कृष्णा खोपडे यांना १ लाख ३ हजार ९९२ मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली होती. यावेळी ते काँग्रेसचे बंडखोर आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आभा पांडे यांनी देखील बंडखोरी केली आहे.

हेही वाचा – ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?

हेही वाचा – अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

काँग्रेस या मतदारसघात सलग तीनदा पराभूत झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) निवडणूक रिंगणात आहे. पेठे यांना आघाडीतील घटकपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळाल्याशिवाय भाजपला येथे टक्कर देणे अशक्य आहे. येथे काँग्रेस विचारांचा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्व नागपूरची जागा लढवता न आल्याची खंत व्यक्त करतात. कार्यकर्त्यांच्या या भावनांना आवर घालून काँग्रेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या प्रचारसभेला महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून एकजुटीचा संदेश दिला. परंतु प्रत्यक्षात सर्व मिळून आघाडीचे काम करणार काय हा खरा प्रश्न आहे.

स्मार्टसिटी भूसंपादनाचा भाजपला फटका ?

भाजप येथून सलग तीनदा विजयी झाली असली तरी आता स्मार्ट सिटीचे भूसंपादन आणि आरक्षित भूखंडांच्या प्रकरणांचा मुद्दांवरून काही भागात रोष दिसून येत आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला सत्ताविरोधी भावनेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.