अमरावती : जिल्‍ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून सर्वाधिक बंडखोरांचे आव्‍हान महायुतीसमोर आहे. मेळघाटमधून केवलराम काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दरम्‍यान, आज भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकविले. त्‍यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्‍या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी सहा महिन्‍यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्‍ये प्रवेश करणारे केवलराम काळे यांना भाजपने उमेदवारी दिल्‍यानंतर भाजपमधील एक गट नाराज झाला. केवलराम काळे यांना उमेदवारी मिळवून देण्‍यामागे माजी खासदार नवनीत राणा यांची मोठी भूमिका असल्‍याचे सांगण्‍यात आले. पण, भाजपमधील निष्‍ठावंतांमध्‍ये त्‍यामुळे रोष निर्माण झाला होता. दरम्‍यान, आज प्रभुदास भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील वाघिणीला ओडिशाचा लळा….पहिले पाऊल टाकताच….

अनेक निवडणुकांपासून मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. १९९५ च्या निवडणुकीत भाजपचे पटल्या गुरुजी मावसकर हे मेळघाट मधून निवडून आले. राजकुमार पटेल हे भाजपचे आमदार म्हणून १९९९ मध्ये विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर प्रभुदास भिलावेकर यांनी मेळघाटात कमळ फुलवले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राजकुमार पटेल यांनी भाजपचे रमेश मावस्‍कर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. गेल्‍या निवडणुकीत प्रभुदास भिलावेकर यांना उमेदवारी नाकारण्‍यात आली होती.

हेही वाचा >>> ‘लाडक्या भावां’ची दिवाळी अंधारातच!

यावेळी देखील त्‍यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. पण, त्‍यांना डावलून केवलराम काळे यांना संधी देण्‍यात आली. केवळ सहा महिन्‍यांपूर्वी पक्षात प्रवेश करणारे उमेदवारी मिळवतात आणि निष्‍ठावंतांवर अन्‍याय केला जातो, अशी भावना व्‍यक्‍त करीत प्रभुदास भिलावेकर यांनी अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढण्‍याचा निर्णय घेतला. प्रभुदास भिलावेकर, ज्योती सोळंके, रेखा मावसकर हे गेल्‍या तीन वर्षांपासून मतदार संघात सक्रिय आहेत. त्‍यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. राजकुमार पटेल यांनी जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली होती. मेळघाटची जागा काहीही झाले तरी शिवसेना शिंदे गटाला सुटू नये आणि आमदार राजकुमार पटेल हे तर महायुतीचे उमेदवार मुळीच नकोत, अशी स्पष्ट भूमिका नवनीत राणा यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. त्‍यामुळे महायुतीने राजकुमार पटेल यांना उमेदवारी नाकारली. राजकुमार पटेल यांना स्‍वगृही परतावे लागले. त्‍यांनी आज प्रहार जनशक्‍ती पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 ex bjp mla prabhudas bhilawekar filed nomination as a independent candidate from melghat assembly constituency mma73 zws