अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण नाईक घराण्यातील ययाती मनोहरराव नाईक विधानसभा निवडणुकीसाठी कारंजा मतदारसंघाच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी ययाती नाईक यांनी समनक जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज सादर केला. त्यामुळे वाशीम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारंजा मतदारसंघात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मविआतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडाचा निशाण फडकवला आहे.
सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रिपदी राहिलेले वसंतराव नाईक यांचे चूलत नातू तथा त्याच परिवारातील दुसरे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक यांनी समनक जनता पक्षाच्यावतीने कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केली. ययाती नाईक यांचे लहान भाऊ आमदार इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना पूसदमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी कारंजा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
हेही वाचा >>> सिंदखेड राजामध्ये ‘एबी फॉर्म’चे महानाट्य; शिवसेना-अजित पवार गट समोरासमोर
ययाती नाईक यांचे वडील मनोहरराव नाईक हे सुद्धा अनेक वर्षे मंत्रिपदावर कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे राज्याच्या राजकारणामध्ये असलेले आदराचे स्थान व कारंजा मतदारसंघांमध्ये नाईक घराण्याचा असलेला वलय बघता ययाती नाईक येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा >>> माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाणार ?
वसंतराव नाईक यांनी मानोरा तालुक्याशी असलेले बालवयापासूनचे संबंध ते राज्याच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत असताना कायम होते. ती परंपरा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, वडील मनोहरराव नाईक यांनी टिकवून ठेवली. त्या परंपरेचा पाईक होऊन दोन्ही तालुक्याची सेवा करण्याचा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने करीत असल्याचे ययाती नाईक यांनी सांगितले.
कारंजा मतदारसंघात मोठी चूरस; मविआमध्ये बंडखोरी
वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात महायुतीतील भाजपकडून सई डहाके, तर मविआतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. ज्ञायक पाटणी, वंचितचे सुनील धाबेकर, एआयएमआयएमकडून मोहम्मद युसुफ पुंजाणी, प्रहारचे डॉ.महेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी देवानंद पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, माजी सभापती जय राठोड आदींनी बंद करीत अपक्ष उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले.