चंद्रपूर: दिवाळी आटोपून पंधरवडा झाला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांची दिवाळी सुरूच आहे. विशेष म्हणजे दिवाळी स्नेहमिलनाच्या आड फराळाच्या कार्यक्रमां ऐवजी उमेदवारांनी समाजातील विविध घटकांना मांसाहारी व मद्य पार्टी देणे सुरू आहे. संपूर्ण जिल्हाभरात अशा स्नेहमिलनाचे आयोजन बघायला मिळत आहे. निवडणूक आयोगांच्या नजरेत भरू नये म्हणून दिवाळी स्नेहमिलन असे गोंडस नाव याला दिले गेले आहे.

यावर्षी प्रथमच दिवाळी व निवडणुका एकत्र आलेल्या आहेत. १५ ऑक्टोबर रोजी आचार संहिता लागू झाल्यानंतर २९ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. विशेष करून रिंगणात असलेल्या उमेदवारांनी दिवाळी स्नेहमिलन अशा गोंडस नावाखाली मांसाहारी व दारू पार्टींचा धडाका सुरू केेला आहे. समाजातील विविध घटकांसाठी या पार्टीचे आयोजन केले जात आहे. दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात दिवाळी फराळाचा आस्वाद घ्यायचा असतो, मात्र येथे दिवाळीच्या फराळा ऐवजी मांसाहार, दारू, मिठाई सोबतच अनेक ठिकाणी संगीताची मेजवानी देखील आहे. प्रत्येक वार्ड व प्रभागात पार्टीचे आयोजन धडाक्यात सुरू आहे. ग्रामीण भागात बकऱ्यांचे मटण व कोंबडीचे चिकण वाढले जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

शहरी भागात मांसाहाराबतच दारू व मासे दिले जात आहेत. प्रभागातील पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता यांना हाताशी धरून असे स्नेहमिलन आयोजित केले जात आहे. काही उमेदवारांनी तर २३ नोव्हेंबर या मतमोजणीच्या दिवसांपर्यंत कॅटरिंग संचालकांना प्रभागांची यादी देवून तिथे मांसाहार व शाकाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवण देण्याचे निर्देशच दिले आहेत. मोठ मोठ्या सभांच्या आयोजनाऐवजी अशा प्रकारच्या जेवणावळी व पार्टीचे आयोजन केले तर त्याचा थेट फायदा होतो असे उमेदवारच सांगत आहेत. केवळ वार्ड किंवा प्रभागातच हे स्नेहमिलन सुरू नाही तर विविध संघटनांसाठी शहरातील हॉटेल मध्येही अशा प्रकारचे आयोजन केले जात आहे. तसेच मतदार बघूनही अशा पार्टी आयोजित होत आहेत.

हेही वाचा : यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….

डॉक्टर, अभियंता असेल तर त्यांच्यासाठी एन.डी. किंवा सिध्दार्थ हॉटेल, प्राध्यापक व शिक्षकांसाठी शिवार अथवा शहरात मात्र गावाला लागून असलेल्या हॉटेलात असे पार्टीचे आयोजन सुरू आहे. पार्टीचा धडाका इतका जोरात आहे की शहरात दररोज किमान पाच ते सहा वार्डात तसेच चार ते पाच हॉटेल मध्ये अशा प्रकारच्या पार्टी व जेवणावळी सुरू आहेत. मात्र या सर्वाकडे निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासाचे दुर्लक्ष आहे. झाेपडपट्टी भागात थेट पैसे वाटप केले जात आहेत तर अनेक प्रतिष्ठीत देखील आमचा दहा ते पंधरा जणांचा ग्रुप आहे असे सांगून उमेदवारांकडून पैसे उकळत आहेत.