Amravati vidhan sabha election result 2024 :अमरावती जिल्‍ह्यात दिग्‍गजांना पराभवाचा धक्‍का; भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसने वर्चस्‍व गमावले

माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख यांच्‍यासह राज्‍यात परिवर्तन महाशक्‍ती ही तिसरी आघाडी उभारणाऱ्या बच्‍चू कडू यांना पराभवाचा हादरा बसला आहे.

Maharashtra vidhan sabha election result 2024 Yashomati Thakur Dr Sunil Deshmukh and Bachchu Kadu defeated in Amravati
भाजपने गेल्‍या निवडणुकीत मिळालेल्‍या एका जागेवरून पाच जागांवर झेप घेतली आहे. (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्‍ता टीम

अमरावती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्‍या विजयानंतर कार्यकर्त्‍यांमध्‍ये संचारलेल्‍या उत्‍साहावर विधानसभा निवडणुकीच्‍या निकालाने विरजण पडले आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख यांच्‍यासह राज्‍यात परिवर्तन महाशक्‍ती ही तिसरी आघाडी उभारणाऱ्या बच्‍चू कडू यांना पराभवाचा हादरा बसला आहे. भाजपने गेल्‍या निवडणुकीत मिळालेल्‍या एका जागेवरून पाच जागांवर झेप घेतली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. महायुतीने चांगली कामगिरी करताना आठपैकी सात जागा पटकावल्‍या आहेत. एक जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली आहे.

अचलपूरचे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांचा भाजपचे नवखे उमेदवार प्रवीण तायडे यांनी १२ हजार १३१ मतांनी पराभव केला. बच्‍चू कडू यांना ६६ हजार ७० तर काँग्रेसचे बबलू देशमुख यांना ६२ हजार ७९१ मते मिळाली. अमरावतीत अनपेक्षितपणे झालेल्‍या चौरंगी लढतीत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) सुलभा खोडके यांनी ५ हजार ४१३ मतांनी बाजी मारली. सुलभा खोडके यांना ६० हजार ८७, तर काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांना ५४ हजार ६७४ मते मिळाली. आझाद समाज पक्षाचे अलीम पटेल यांना ५४ हजार ५९१ तर भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांना ३४ हजार ६७ मते प्राप्‍त झाली.

आणखी वाचा-Warora Assembly Election Result 2024 : घराणेशाही जिंकली; घराणेशाही हरली? वरोरा मतदारसंघात सत्तर वर्षांत प्रथमच कमळ

बडनेरामधून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा हे सुमारे ६६ हजार ३९७ मताधिक्‍याने निवडून आले. त्‍यांनी शिवसेना ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांचा पराभव केला. राणा यांना १ लाख २६ हजार ४९६, प्रीती बंड यांना ६० हजार ९९, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुनील खराटे यांना ६ हजार ७४४ तर भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय यांना ३ हजार २४२ मते मिळाली.

मेळघाटमधून भाजपचे केवलराम काळे सर्वाधिक १ लाख ६ हजार ८५९ इतक्‍या मताधिक्‍याने निवडून आले. त्‍यांनी काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे यांचा पराभव केला. काळे यांना १ लाख ४५ हजार ९७८ तर चिमोटे यांना ३९ हजार ११९ मते मिळाली. प्रहारचे राजकुमार पटेल यांना तिसरे स्‍थान ( २५ हजार २८१ मते) मिळाले. तिवसामध्‍ये काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांचा भाजपचे राजेश वानखडे यांनी ७ हजार ६१६ मतांनी धक्‍कादायक पराभव केला. वानखडे यांना ९९ हजार ६६४ तर ठाकूर यांना ९२ हजार ४७ मते प्राप्‍त झाली.

आणखी वाचा-Gondia District Vidhan Sabha Result : गोंदियात इतिहास; पहिल्यांदाच फुलले कमळ, जिल्ह्यात महायुतीचा भगवा झेंडा

दर्यापुरातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे हे निवडून आले. त्‍यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांचा १९ हजार ७०९ मतांनी पराभव केला. लवटे यांना ८७ हजार ७४९ तर बुंदिले यांना ६८ हजार ४० मते मिळाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांना केवळ २३ हजार ६३२ मते प्राप्‍त झाली. मोर्शीतून भाजपचे उमेश यावलकर हे ६४ हजार ९८८ मतांनी निवडून आले. या ठिकाणी चौरंगी लढत झाली. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार यांना ३४ हजार ६९५, काँग्रेसच्‍या शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांना ३१ हजार ८४३ मते प्राप्‍त झाली. धामणगावमध्‍ये १९ व्‍या फेरीअखेर भाजपचे प्रताप अडसड हे १२ हजार ८६४ मतांनी आघाडीवर आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election result 2024 yashomati thakur dr sunil deshmukh and bachchu kadu defeated in amravati mma 73 mrj

First published on: 23-11-2024 at 18:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या