अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. ५० हजारावर मताधिक्य मिळवत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव केला. रणधीर सावरकर यांनी विक्रमी एक लाख सात हजारावर मते मिळवली आहेत. वंचित आघाडी तिसऱ्या स्थानावर घसरली. अकोला पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विक्रमी मताधिक्याने तो कायम राखण्यात भाजपला यश आले आहे.
जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघामध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते. त्यात एक लाख १४ हजार ५९० पुरुष, एक लाख चार हजार २१८ महिला व इतर तीन असे एकूण दोन लाख १८ हजार ८११ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. अकोला पूर्व मतदारसंघात एकूण २६ फेऱ्या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच भाजपचे रणधीर सावरकर यांनी आघाडी घेतली. सव्विसाव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर यांनी एक लाख सात हजार २६७, शिवसेनेचे गोपाल दातकर ५६ हजार ९५६ व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांना ५० हजार १६० मते मिळाली. भाजपने ५० हजार ३११ मतांची विजयी आघाडी मिळवली.
अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांच्यासाठी कोट्यवधींचे विकास कामे, पक्षाचे मजबूत जाळे व तळागाळातील जनसंपर्क जमेची बाजू ठरली. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर व वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात लढत मानली जात होती. मात्र, निवडणुकीमध्ये भाजपने एकतर्फी वर्चस्व कायम राखले. २०१४ मध्ये भाजपचे रणधीर सावरकर सर्वप्रथम अकोला पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेत त्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. यावेळेस तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले होते. आपले जुने मताधिक्याचे विक्रम मोडीत काढत त्यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
लोकसभेमध्ये अकोला पूर्व मतदारसंघात भाजपने तब्बल २७ हजार ४७७ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीत त्यामध्ये मोठी वाढ झाली. भाजपची आघाडी ५० हजार ३११ मतांवर पोहोचली. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ पासून मोठ्या प्रमाणात भाजपला जनाधार मिळाला. आता त्यामध्ये आणखी भर पडल्याचे दिसून येते.