नागपूर: सरकारमध्ये ४१ बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यावरून सरकारने अनोखा विक्रम केला आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी धक्कादायक माहिती दिली. विद्यमान सरकारने ४१ बिनखात्याचे मंत्री अधिवेशनकाळात काम करत असल्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. अगदी दोन उपमुख्यंत्रीसुद्धा बिनखात्याचे आहेत. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कारभार चालवित आहेत. सरकारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले की ते लोकशाहीला मारक असते. त्यामुळे सत्तापक्ष मुजोर बनतो. तसे चित्र सध्या दिसून येत आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप
जाधव पुढे म्हणाले की, ‘निवडणुका जिंकण्यासाठी सवंग लोकप्रियतेच्या योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच तो पैसा जनतेवर वेगवेगळे कर लादून वसूल करायचा. याऐवजी राज्याला आर्थिक शिस्त लावायला हवी,’ सरकारकडून होणाऱ्या आर्थिक शिस्तीच्या अभावावर आणि अनावश्यक खर्चांवर चिंता व्यक्त केली. प्रकल्प, योजना यांवरील खर्च कमी होता कामा नये. यासाठी आर्थिक शिस्त आणण्याची गरज आहे. तसेच पुरवणी मागण्यासंदर्भात गोडबोले समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, पुरवणी मागणी या अर्थसंकल्पाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. परंतु, सरकारने पुरवणी मागण्यांची मर्यादा ओलांडत वीस टक्क्यांपर्यंत नेली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.’ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी दिलेल्या उत्तरामुळे मंत्री धनंजय मुंडे आज सभागृहात अवतरले असावेत, असा टोला जाधव यांनी लगावला.