नागपूर : नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थंडीचा ज्वर चढायला लागला असून आता राज्यात सर्वत्रच शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. राज्यात सर्वत्रच किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तरेकडून हिमालयाच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. परिणामी राज्यात येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. विशेषकरुन मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असून याठिकाणी थंडीचा जोर वाढणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर धुक्याची चादर दिसू लागली आहे. तर उन्हाळ्यात प्रचंड तापणाऱ्या विदर्भात देखील किमान तापमान गोंदिया येथे ११.४ अंश सेल्सिअस तर नागपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.

हेही वाचा – रेल्‍वे रुळाला तडा, ट्रॅकमॅनने चार कि.मी. धावत जाऊन एक्‍स्प्रेस रोखली अन्…

गेल्या दोन दिवसात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये ८.३ अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आहे. तर पुण्यात देखील किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. नोव्हेंबरचा अखेरचा आठवडा चांगलाच गारठवणारा ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील रात्रीच्या वेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी आणि विशेषकरुन बांधकामाच्या ठिकाणी मजूर, कष्टकरी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आतापर्यंत रात्री ते पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी आता दिवसादेखील जोर धरत आहे. त्यामुळे दिवसाही आता गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा – रेल्‍वे रुळाला तडा, ट्रॅकमॅनने चार कि.मी. धावत जाऊन एक्‍स्प्रेस रोखली अन्…

हवामान खात्याने पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र राहील, असा इशारा दिला आहे. राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना थंडीपासून बचावासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. दरवर्षी साधारणपणे दिवाळीच्या सुमारास थंडीला सुरुवात होते. मात्र, यावेळी उशिराने थंडीला सुरुवात झाली. गुलाबी थंडीचा आनंद फार दिवस घेता आला नाही, पण नोव्हेंबरच्या अखेरीस अचानकपणे थंडीत वाढ झाली. किमान तापमानात अतिशय वेगाने घसरण सुरू झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. तर येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्यांची संख्याही वाढणार हे निश्चित आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather cold warning for these districts rgc 76 ssb