नागपूर : मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले. दरम्यान, या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरीही तो तेव्हढ्यापुरताच होता. राज्याच्या अनेक भागातून पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. रविवार १४ एप्रिलला तापमानात वाढ नोंदवली गेली तर उकाडा देखील प्रचंड वाढला. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असून उकड्यातही वाढ होईल असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवकाळी पाऊस येण्यापूर्वी विदर्भात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. विदर्भातील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवला गेला. अवकाळी पावसामुळे तो खाली आला होता. ४० अंश सेल्सिअसपेक्षाही तो कमी नोंदवला गेला. मात्र, आता हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा दिला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच मुंबईत देखील ही तापमानवाढ होऊ शकते.

हेही वाचा : मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

कमाल तापमानसह किमान तापमानातदेखील वाढ होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने “येलो अलर्ट” जारी केला आहे. मात्र, त्याचवेळी तापमान वाढ आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather update chances heat wave in vidarbh western maharashtra marathwada rgc 76 css