नागपूर : पहाटे आणि रात्रीचा हलका गारवा वगळता राज्यातून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.

उन्हाचा दाह कमी होण्यास तयारच नसून दिवसागणिक तो वाढतो आहे. राज्यात येत्या काही दिवसात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, इकडे तापमानातील वाढ कायम राहणार असली तरीही इशान्य भारतात मात्र पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार आहे. याठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या दोन दिवसात हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा चढलेला राहणार आहे.

विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान एक ते दोन अंशांनी कमी होईल आणि त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढ होईल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे शुक्रवारी सर्वाधिक ३८.३ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर वर्धा येथेही ३७.७ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

त्यापाठोपाठ नागपूर येथे देखील ३५.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार येथे ४० अंश सेल्सिअससह राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईत देखील तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहचले होते.

Story img Loader