नागपूर : विदर्भात एकीकडे तापमानाचा पारा पुन्हा वाढत जात असताना राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट मात्र अजूनही टळलेले नाही. हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच अवकाळी पाऊस देखील डोकावत आहे. राज्यात अजूनही संमिश्र वातावरण असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान अनुभवायला मिळत आहे. सध्या राज्यातील तापमान ३६ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. १५ एप्रिल रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही शहरांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
“या” जिल्ह्यात पाऊस
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत १५ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी १५ एप्रिल रोजी “येलो अलर्ट” जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस कशामुळे
सध्याच्या घडीला देशात मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते अगदी मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शिवाय मध्य प्रदेशासह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत, ज्यामुले महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
तापमानात चढउतार कशामुळे
मागील ४८ तासांपासून राज्याच्या काही भागांमध्ये सातत्याने तापमानवाढ होत असतानाच काही भाग मात्र अवकाळीचा तडाखा सहन करताना दिसत आहे. एकिकडे अवकाळी तर दुसरीकडे वादळी पाऊस यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानातील चढ- उतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार राजच्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाला पुढील २४ तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.