नागपूर : राज्यभर सहा नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा कायापालट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लबच्या संयुक्त विद्यामाने बुधवारी मुख्यमंत्र्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून विदर्भ आणि महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे. दरम्यान, सरकारी घरकूल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जेचा मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी परवाच महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. शासनाने ऊर्जा क्षेत्रासाठी २५ वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सौर ऊर्जेसह विविध क्षेत्रातून विजेची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये विजेचे दर कमी होतील, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> लोकजागर : संधीचे सोने अन् माती!

गडचिरोलीचा पालकमंत्री होण्यास इच्छुक

पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. त्यांनी मला बीडला पाठवले तर बीडला जाईन. साधारणत: मुख्यमंत्री स्वत:कडे पालकमंत्रीपद ठेवत नाही. पण, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे असावे, अशी माझी इच्छा आहे. त्याला महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल, असेही फडणवीस म्हणाले.

माझ्या डोक्यात सत्ता कधीच जाणार नाही

जनतेने पुन्हा संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न आहे. हे करताना पारदर्शी, प्रामाणिक सरकार चालले पाहिजे हा माझा आग्रह आहे. राजकारणात लोक आव्हान निर्माण करतात. पण कितीही मोठे आव्हान असेल, तरी धैर्याने त्यांचा मी सामना करतो. सत्ता माझ्या डोक्यात जात नाही, असेही फडणवीस म्हणाले.

पोस्ट फॉरवर्डकरणारेही गुन्हेगार

● सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग झाला पाहिजे. पण, काही लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राज्यात सायबर जागरुकता अभियान सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ‘सायबर सिक्युरिटी प्लॅटफार्म’ तयार केला आहे.

● मी सभागृहात नक्षलवाद्यांविषयी बोललो. पण, ते वगळून केवळ संविधानाला मानत नाही, एवढीच चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. पण, मी सांगू इच्छितो, अशाप्रकारची चित्रफीत कोणी केली आणि ती कुणी-कुणी फॉरवर्ड केली, हे लगेच शोधून काढणे शक्य आहे. मोडतोड करून चित्रफीत तयार करणारा गुन्हेगार आहेच. पण, ते ‘फॉरवर्ड’ करणारा सहआरोपी होतो, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

पंतप्रधानांकडून नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी

खजुराहो : मध्य प्रदेशातील खजुराहो येथे ‘केन-बेतवा नदीजोड प्रकल्पा’ची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जलस्राोतांच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीने आणि विचाराने देशाच्या जलस्राोतांचे बळकटीकरण, व्यवस्थापन आणि धरण बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे मोदी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आणि विरोधी पक्ष काँग्रेसने या मुद्द्यावरून केलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे.दरम्यान, केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र अभयारण्याला धोका असल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

Story img Loader