नागपूर : मोसमी पाऊस यंदा सरासरी पूर्ण न करताच परतला आणि राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा सुरू झाला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक होता. मात्र, आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार, ऐन दसऱ्याला दुर्घटना
विदर्भात तापमानाचा कहर अजून कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. पुणे शहराच्या तापमानात घट झाली. राज्यातील सर्वच शहरांचे तापमान आता कमी होऊ लागल्यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातही काही भागांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन पीक कापणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.