राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच शाब्दिक चिमटे काढले. एका क्षणी कौतुक तर दुसऱ्या क्षणी टोला लगावत अजित पवारांनी आज विधानसभेमधील भाषणामधून वेगवेगळ्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे एका विषयाबद्दल बोलताना अजित पवारांनी थेट फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा संदर्भ दिला. हा संदर्भ ऐकून सभागृहातील सर्वचजण हसू लागले.
“भाजपामध्ये आता जे नेते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या बोलण्याचा रोख हा चंद्रशेखर बावनकुळेंच्या दिशेने होता. बानकुळेंनी बारामतीमध्ये घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची टीका केली होती त्याचा उल्लेख करत अजित पवारांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना खोचक टोले लगावले.
बावनकुळेंवर टीका करताना अजित पवारांनी त्यांचा थेट उल्लेख टाळला. “अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशाप्रकारच्या वल्गना ते करतात. आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?” असा प्रश्न अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहून विचारला.
नक्की वाचा >> Maharashtra Winter Session: “…तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन”, फडणवीसांसमोरच अजित पवारांचा भाजपा नेत्याला इशारा
“सहकाराच्या मुद्द्यावरुन राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे गेलं की, ते कायम फडणवीसांना विचारुन सांगतो असं उत्तर देतात,” अशी टीका करत अजित पवारांनी अतुल सावेंना लक्ष्य केलं. “आपण सहकार मंत्री आहात. पूर्वी औरंगाबादच्या विनायकराव पाटलांनी सहकारमंत्रीपद फार चांगलं भूषवलं होतं. पण अजून तुम्ही सहा महिन्यांमध्ये त्या खात्यात रुळलाच नाहीत. काही तुमच्याकडे काम आणलं की देवेद्रजींना विचारतो,” असं म्हणत पवारांनी सावेंवर टीका केली. पुढे अजित पवारांनी, “अरे, देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत ना बाबा. अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय? ते कतृत्ववान असल्याने सहा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेत. पण त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त चांगलं होणार नाही?” असा प्रश्न सरकारला विचारला.
नक्की वाचा >> “बाबांनो, रात्री १२ ते ३…”; विनायक मेटे, जयकुमार गोरेंचा उल्लेख करत हिवाळी अधिवेशनात अजित पवारांची सर्व आमदारांना विनंती
फडणवीसांकडे सहा खाती आणि सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याचं अजित पवार म्हणाले. “आज इथल्या (सभागृहातील) महिला बाहेर गेल्या आहेत. तुम्ही महिलांबद्दल सांगताय. भाजपालाही महिलांची मतं मिळाली. सहा महिन्यात एक महिला सापडेना तुम्हाला मंत्री करायला?” असा उपहासात्मक सवाल अजित पवारांनी विचारला. “अरे हा कुठला कारभार?” असंही अजित पवार म्हणाले.
त्यानंतर अजित पवारांनी महिला मंत्री करण्यासाठी आता थेट अमृता फडणवीसांकडेच जावं लागेल अशा अर्थाचं विधान केलं. देवेंद्र फडणवीसांकडे पाहत अजित पवारांनी, “मी आता येऊन (अमृता) वहिनींनाच सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे,” असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला. “मी टीका म्हणून बोलत नाही. आपण महिलांना पुरुषांच्याबरोबरीनं कामाची संधी द्यावी. निर्णय प्रक्रियेत घ्यावं,” असं अजित पवार म्हणाले.