राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा संदर्भ देत एक विधान केलं होतं. थेट अमृता फडणवीसांचा संदर्भ घेऊन अजित पवारांनी केलेल्या या विधानाला आज देवेंद्र फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिलं. फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये दिलेलं हे उत्तर ऐकून सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
नेमका संदर्भ काय?
मंगळवारी सभागृहामध्ये बोलताना अजित पवार यांनी फडणवीसांचं कौतुक करतानाच टोलेबाजीदरम्यान अमृता वाहिनी असा उल्लेख करत थेट उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा संदर्भ दिला. “भाजपामध्ये आता जे नेते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं म्हणत अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामतीत येऊन दिलेल्या आव्हानाची आठवण करुन दिली. बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम खरंच त्यांना शक्य होणार आहे का असा टोला पवारांनी लगावला. याचवेळी त्यांनी पुढे देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख केला होता.
नक्की वाचा >> “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला
फडणवीसांकडे सहा खाती अन् सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद
या भाषणामध्ये अजित पवारांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्यावर निशाणा साधताना सहकारमंत्र्यांकडे काहीही काम नेलं की ते उपमुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत असल्याचं म्हटलं. “सहकाराच्या मुद्द्यावरुन राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे गेलं की, ते कायम फडणवीसांना विचारुन सांगतो असं उत्तर देतात,” अशी टीका करत अजित पवारांनी अतुल सावेंना लक्ष्य केलं. तुम्ही सहा महिन्यांमध्ये त्या खात्यात रुळलाच नाहीत. काही तुमच्याकडे काम आणलं की देवेद्रजींना विचारतो,” असं म्हणत पवारांनी सावेंवर टीका केली. पुढे अजित पवारांनी, “अरे, देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत ना बाबा. अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय? ते कतृत्ववान असल्याने सहा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेत. पण त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त चांगलं होणार नाही?” असा प्रश्न सरकारला विचारला.
नक्की वाचा >> “शीशेमे रेहनेवाले घरमे…”; फडणवीसांनी मराठीमिश्रीत हिंदीतून केलेल्या ‘त्या’ कमेंटने पिकला एकच हशा! CM शिंदेंनाही हसू अनावर
महिला मंत्री सापडली नाही
फडणवीसांकडे सहा खाती आणि सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याचं अजित पवार म्हणाले. “आज इथल्या (सभागृहातील) महिला बाहेर गेल्या आहेत. तुम्ही महिलांबद्दल सांगताय. भाजपालाही महिलांची मतं मिळाली. सहा महिन्यात एक महिला सापडेना तुम्हाला मंत्री करायला?” असा उपहासात्मक सवाल अजित पवारांनी विचारला. “अरे हा कुठला कारभार?” असंही अजित पवार म्हणाले.
अमृता फडणवीसांचा उल्लेख
त्यानंतर अजित पवारांनी महिला मंत्री करण्यासाठी आता थेट अमृता फडणवीसांकडेच जावं लागेल अशा अर्थाचं विधान केलं. देवेंद्र फडणवीसांकडे पाहत अजित पवारांनी, “मी आता येऊन (अमृता) वहिनींनाच सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे,” असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला. “मी टीका म्हणून बोलत नाही. आपण महिलांना पुरुषांच्याबरोबरीनं कामाची संधी द्यावी. निर्णय प्रक्रियेत घ्यावं,” असं अजित पवार पुढे म्हणाले.
नक्की वाचा >> Maharashtra Winter Session: “…तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन”, फडणवीसांसमोरच अजित पवारांचा भाजपा नेत्याला इशारा
फडणवीसांचं उत्तर
अजित पवारांनी केलेल्या या उल्लेखाची चर्चा अगदी प्रसारमाध्यमांपासून अधिवेशाच्या दिवसांमध्ये राजकीय वर्तुळातही रंगत असतानाच आज फडणवीसांनी या टीकेचा उल्लेख करत थेट अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा संदर्भ दिला. झालं असं की फडणवीस हे सभागृहामध्ये बोलत असताना त्यांनी विजेसंदर्भातील जीआर आपण ट्वीटर आणि फेसबुकवर पोस्ट केल्याचं अजित पवारांचा उल्लेख करत सांगितलं. त्यावर एका सदस्याने “ते तुम्हालाच फॉलो करतात,” असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. या वाक्यावर फडणवीसही हसले. त्यानंतर फडणवीसांनी, “ते विरोधी पक्षनेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतो,” असं म्हटलं. पुढे फडणवीस यांनी अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा केलेला उल्लेख आठवत अजित पवारांनाच प्रश्न विचारला. “खरं म्हणजे दादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं?” असा प्रश्न विचारुन फडणवीस हसू लागले.