नागपूर : फेइंगल चक्रीवादळाने राज्याला तब्बल आठ ते दहा दिवस वेठीस धरले. मात्र, जाताजाता हे चक्रवादळ दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस देऊन गेले. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. थंडीला पुरते परतावून लावणाऱ्या या चक्रीवादळाचा प्रभाव आता जवळजवळ संपला आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या थंडीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
राज्यात नोव्हेंबर अखेरीस नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. थंडीचा कडाका वाढत चालल्याने शेकोट्या पेटायला लागल्या होत्या. राज्यातील किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले होते. मात्र, फेइंगल चक्रीवादळाने हवामानाचे पूर्ण गणित पालटले. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आल्याने महाराष्ट्रातही पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते.
हेही वाचा : ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
हिवाळ्याची चाहूल लागताच आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता चक्रीवादळाचा प्रभाव जवळजवळ ओसरला आहे आणि तीच हिवाळ्यातल थंडी पुन्हा परतणार आहे. त्याचवेळी राज्यात गारठ्यात देखील वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तापमानात अजून घसरण झाली नसली तरीही थंडीची थोडी चाहूल मात्र लागली आहे.
दरम्यान, गोंदिया, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणही होते. कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा हलका प्रभाव दिसून आला. प्रादेशिक हवामान खात्याने शनिवारी देखील विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज दिला. मात्र, आता राज्यातून गायब झालेली थंडी परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या शहरात १५ हजार कोटींची गुंतवणूक; तब्बल ४५० एकर जमिनीवर…
कमाल आणि किमान तापमानातही आता हळूहळू घट होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रविवारपासून हवामानात बदल दिसून येतील. किमान तापमानात एक ते दोन अंशाने घसरण होऊन पुढील आठवड्यापासून थंडीला पुन्हा सुरुवात होणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. वातावरणातील आर्द्रता देखील वाढली होती. ऐन हिवाळ्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा : नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
मात्र, आता पुन्हा थंडी परतणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. रविवारपासून हवामानात बदल दिसून येईल आणि त्यानंतर किमान व कमाल तापमानात देखील घसरण होऊन थंडीत वाढ होईल. गेल्या दोन ते तीन दिवसातच ते तापमान २० आणि ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.