नागपूर: जगातील सर्वात काठिण्य पातळी असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी)परीक्षेत २००९ मध्ये शाह फैसल या मुस्लीम तरुणाने देशात अव्वल स्थान मिळवल्यानंतर मुस्लीम उमेदवारांचा ‘यूपीएससी’ परीक्षेमधील ओढा वाढला. मागील पाच वर्षांत ‘यूपीएससी’मध्ये मुस्लीम उमेदवारांच्या निकालाचा टक्का वाढला आहे.

यंदा यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अनम अश्फाक अहमदने १४२ वा क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लीम भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे. तिचा संघर्षमय प्रवास कसा होता हे जाणून घेऊया.

यवतमाळ येथील अबिदा अनम अश्फाक अहमद हिला संपूर्ण भारतातून १४२ वा क्रमांक मिळवला आहे. ती यवतमाळ येथे कळंब चौकात तिचे मोठे वडील मुस्ताक अहमद यांच्याकडे राहते. त्यांचे स्वत:चे मालकीचे घर सुद्धा नाही. ती शायर अश्फाक शाद यांची मुलगी आहे. ते भाड्याने ऑटोरिक्षा चालवतात.

अदिबाचे प्राथमिक शिक्षण जाफरनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून झाले. अकरावी, बारावी विज्ञान शाखेत जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट ज्युनिअर कॉलेज यवतमाळ येथून पूर्ण केले.

पुढे गणित विषय घेऊन बी. एससी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युनिक अकॅडेमी पुणे येथून यूपीएससीची शिकवणी घेतली. त्यानंतर मुंबई हज हाउस आयएस प्रशिक्षण संस्थेमध्ये राहून अदिबाने यूपीएससीची अभ्यास केला. नंतर जामिया इस्लामी युनिव्हर्सिटीत तिने अभ्यास केला.

चौथ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले आणि स्वप्न पूर्ण झाले असे अदिबाने सांगितले. तीनदा अपयश आल्यावरही निर्धार न सोडता अदिबा अनमने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश मिळवले. यूपीएससीमध्ये १४२ वा क्रमांक प्राप्त करत अदिबाला महाराष्ट्रातील पहिली मुस्लीम महिला आयएएस बनण्याचा बहुमानही मिळणार आहे. तिच्या यशाचा संघर्ष सर्वच समाजातील मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी असा आहे.