नागपूर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून परिणामतः गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले. तसेच हत्याकांड आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबईमध्ये घडले असून दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्र्याचे शहर ठाण्याचा क्रमांक लागतो. तिसऱ्या स्थानावर नागपूर तर चवथ्या स्थानावर पुणे शहर कायम आहे, ही आकडेवारी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात गेल्या वर्षभरातील गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक हत्याकांडाच्या घटनांमध्य वाढ झाल्याचे दिसते. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र आहे. तसेच राज्य पोलीस दलातील वाढता भ्रष्टाचार आणि अनेक गुन्ह्यात आरोपींना चक्क पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचे समोर आले. हत्याकांडाच्या बाबतीत राज्यात टोळीयुद्धे, कौटुंबिक हिंसाचार, प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधासह जुने वैमनस्यातून सर्वाधिक हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक खुनाच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. मुंबईत वर्षभरात १०१ हत्याकांडाच्या घटना घडल्याचे उघडकीस आले. यामध्ये सर्वाधिक खून वैमनस्य आणि टोळीयुद्धातून झाल्याची माहिती समोर आली. हत्याकांडाच्या घटनांमध्ये दुसऱ्या स्थानावर माजी मुख्यमंत्र्याचे शहर ठाण्याचा क्रमांक लागतो. ठाण्यात ९६ हत्याकांड घडले आहेत. त्यात जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातील तब्बल २६ हत्याकांडांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर गृहमंत्र्याचे शहर नागपूरचा क्रमांक लागतो. नागपुरात ९१ हत्याकांड घडले असून चवथ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. पुण्यात ८७ हत्याकांड घडले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ८१ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व ठेवण्यासाठी गुन्हेगार प्रयत्न करतात. याच कारणातून गुन्हेगांरांमध्ये टोळीयुद्ध घडत आहेत. टोळीयुद्धातसुद्धा अनेक हत्याकांड राज्यात घडलेल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा…सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा

पोलिसांचा वचक संपला

राज्यातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रभावी वापर करणे, गुन्हेगारांची वारंवार तपासणी करणे, गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा व ‘एमपीडीए’नुसार कारवाई करून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न इत्यादी कामावर पोलिसांचे लक्ष हवे. मात्र, सध्या राज्य पोलीस दलावर राजकीय दबाव आणि पोलिसांमधील भ्रष्ट प्रवृत्तीं वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवर गुन्हेगार वरचढ भरत आहेत.

हेही वाचा…सावरकरांनंतर आता नरेंद्र दाभोलकरांच्या नावासाठी आग्रह; उद्घाटनीय स्थळाला नाव देण्याची ‘अंनिस’ची मागणी

टोळीयुद्ध-अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड

राज्यातील सर्वाधिक हत्याकांड घडण्यासाठी टोळीयुद्ध, संपत्ती आणि पैशाचा वाद, अनैतिक संबंध, प्रेम संबंध हे मुख्य कारण ठरल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या हत्याकांडातील आरोपींमध्ये प्रियकर, नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रतिबंधात्मक कारवाया, स्थानबध्दतेची कारवाई आणि गुन्हेगारांवर डिजीटल वॉच ठेवतात. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न पोलीस करीत आहेत. राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त (नागपूर पोलीस आयुक्तालय)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtras highest murders occurred in mumbai followed by thane nagpur and pune says police data adk 83 sud 02