नागपूर: नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत नागरिकांना बरेच आमिष दाखवले जातात. परंतु प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टी मिळत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. नागरिकांच्या हितासाठी येथून पुढे महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पात काय राहील याबाबत नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढे नवीन गृहनिर्माण प्रकल्पात घर घेतांना ग्राहकांना काही गोष्टी बघणे महत्वाचे ठरणार आहे.
महारेराच्या नवीन नियमानुसार येथून पुढे गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा नोंदणीक्रमांक, महारेरा संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड संबंधित प्रकल्पाच्या जाहिरातीतील संपर्क क्रमांक आणि पत्ता यात ज्याचा फाॅन्ट मोठा असेल त्या फाॅन्टमध्ये छापणे बंधनकारक करण्यात आले आहे . शिवाय हा सर्व तपशील जाहिरातीच्या वरील भागात उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे निर्देश महारेराने एक परिपत्रक काढून नुकतेच जारी केले आहेत. हे निर्देश तातडीने लागू करण्यात आले आहेत.
सादर आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर ५० हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर १० दिवसांत चुकीची दुरूस्ती करून महारेरा नोंदणीक्रमांक, संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड विहित आकारात ठळकपणे छापला नाही, तर “निर्देशांचा सततचा भंग” गृहीत धरून नियमानुसार यथोचित कारवाई केली जाईल.
महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळ , क्यूआर कोड ठळकपणे छापणे यापूर्वीच अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. परंतु अनेकदा ह्या बाबी शोधाव्या लागतात, अशा पध्दतीने छापल्या जातात, असे महारेराच्या निदर्शनास आले आहे. मुळात पारदर्शकपणे सहजपणे ह्या बाबी इच्छुक घरखरेदीदारांना दिसायला हव्यात . त्यातच महारेराने क्यूआर कोड बंधनकारक यासाठी केलेला आहे की घरखरेदीदारांना एका क्लिकवर संबंधित प्रकल्पाची माहिती उपलब्ध व्हावी. परंतु अनेकदा हे क्यूआर कोड स्कॅनच होत नाहीत . त्यामुळे त्याचा हेतू साध्य होत नाही. आता क्यूआर कोड स्कॅन होऊ शकले नाही तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, लिफलेटस, पोस्टर्स, व्हाट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक, महारेरा संकेतस्थळ , क्यूआर कोड विहित आकारात छापणे बंधनकारक आहे. ग्राहकांसाठी अत्यंत दूरगामी असलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे, असे आवाहन महारेराने केले आहे.