वर्धा : हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केल्या जाणार आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीस महाशिवरात्री साजरी केल्या जाते. या दिवशी शिव व पार्वती यांचा विवाह पार पडला, अशी पौराणिक मान्यता आहे. कडकडीत उपवास पण फराळ दिमतीस असतोच. काही केवळ दुधावर तर बरेच विविध फराळी खाद्यवार दिवस काढतात. आता तर बाजारात या दिवशी विविध फराळी खाद्यची रेलचेल दिसून येते. म्हणून अन्न व औषधी प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
उपवास करणारे मोठ्या भगर, साबुदाणा, शिंगाडा व राजगिरा पीठ तसेच अन्य पदार्थांचा वापर करतात. मात्र या पदार्थांचे सेवन केल्याने विषबाधा झाल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत, असे अन्न व औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र. भा. टोपले यांनी निदर्शनास आणले आहे. म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाजारातून पदार्थ आणल्यावर ते स्वच्छ करावे. शक्यतो पाकीटबंद पदार्थ घ्यावे. पॅकिंग व अंतिम वापर दिनांक तपासावा. हे अन्नपदार्थ झाकणबंद डब्यात व कोरड्या ठिकाणी ठेवावे. ओलावा असल्यास बुरशी लागणार. ज्यास्त दिवस साठवू नये.फराळासाठी उघड्यावरचे पदार्थ विकत घेणे टाळावे. भगरीची भाकर करण्याऐवजी खिचडी खावी. भगर व शेंगदाणे यात अधिक प्रथीने असतात. सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन ऍसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे विकार होवू शकतात. म्हणून पचन क्षमतेनुसार भगर व शेंगदाणे खावेत. शिळ्या अन्न पदार्थांचे सेवन करू नये.
या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ विकणाऱ्यांना पण सूचना करण्यात आल्या आहेत. विक्रेत्यांनी पॅकबंद पदार्थांचीच विक्री करावी. पदार्थ विकत घेतांना उत्पादक किंवा विक्रेत्याकडून बिले घ्यावीत. पदार्थाचे पॅकेट तसेच पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना, पॅकिंग व अंतिम वापर दिनांक याची खात्री करावी. विक्रेत्यांनी मुदतबाह्य पदार्थांची विक्री करू नये. तयार अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये व ते तयार करतांना आरोग्य तसेच स्वच्छतेचे निकष पाळावे, अशी सूचना हॉटेल मालकांना करण्यात आली असल्याचे आयुक्त टोपले यांनी नमूद केले.
अध्यात्म व व्रतवैकल्याचे जाणकार पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री हे म्हणतात की फराळबाबतीत खबरदारी आवश्यक आहे. या दिवशी अनेक ठिकाणी फराळ वाटप केल्या जाते. सार्वजनिक ठिकाणी होणारे असे वितरण दक्षता घेऊन झाले पाहिजे. अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. खरं तर हा फराळ नव्हे तर शिवजीला अर्पण केल्या जाणारा प्रसाद असतो. घरच्या गृहिणीने पवित्र मनाने व स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेला प्रसाद पावतो. प्रसाद फराळ ही आराधना समजावी. मिताहार करावा.