अकोला : महाशिवरात्रीची महान रात्री सूर्यमालेतील सातही ग्रह एकाच वेळी उपस्थित आहेत. बुध, शनी, शुक्र, गुरु व मंगळ हे पाच ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील. २७ पासून सर्वात सुंदर व वललांकित असलेला शनी ग्रह अस्त असल्याने दिसणार नाही, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. प्रत्येक महिन्याला अमावास्येच्या आधी येणारी शिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटल्या जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या उत्सवाचे महत्व आहे. भारतीय परंपरेत प्राचीन आणि निसर्गाला धरुन कालानुरूप होणाऱ्या वातावरणातील बदलांचा सुद्धा समावेश झालेला दिसतो. पृथ्वी परिवलन आणि परिभ्रमण चक्रात घडून येणाऱ्या हवामान स्थिती नुसार बदलता परिणाम लक्षात घेऊन विविध सण, उत्सवाची निर्मिती त्याला अनुरूप अशी व्यवस्था केली आहे.

महाशिवरात्रीचा जोड कालावधी

महाशिवरात्री हा महत्त्वाचा उत्सव उत्तर गोलार्धात संपणारा हिवाळा आणि उन्हाळ्याची सुरुवात असा जोड कालावधी आहे. निसर्गातील ऋतूनुसार होणारे बदल मानवी जीवाला अधिक उपयुक्त व सहायक ठरावेत, त्यासाठी आहार आणि विहारात आवश्यक ते बदल केले आहेत. बदलत्या जीवन शैलीत ते महत्त्वाचे आहेत. प्राचीन काळापासून मानवाला आकाशाचे वेड असून आपल्या पुर्वजांनी काही उपयुक्त रुढी, परंपरा दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्यांचे नाते आकाशातील ग्रह ताऱ्यांशी जोडले. आकाशातील काही तारकांना सप्तर्षी अगस्त्य, ऋषीमुनी, अंबरिष, वृषपर्वा, ययाती राजे महाराजे आदींची नावे दिली आहेत.

महाशिवरात्रीची पौराणिक कथेचा संदर्भ याच कालावधीत पूर्व क्षितिजावर येणाऱ्या मृग नक्षत्र, व्याध ताऱ्याशी व हरणाच्या पोटात मारलेल्या त्रिकांड बाणाशी जोडलेला दिसतो, असे दोड म्हणाले. सद्यस्थितीत पूर्ण आकाशात सात राशी आणि चौदा नक्षत्रांची ओळख करून घेता येईल. यामध्ये सायंकाळी पूर्व आकाशात सिंह राशीचा उदय, जरा वरच्या बाजूला कर्क, मिथुन राशी व मंगळ ग्रह डोक्यावर वृषभ राशी व गुरु ग्रह, उत्तर-पूर्व आकाशात सप्तर्षी, नेमका उत्तरेला ध्रुव तारा, डाव्या बाजूला शर्मिष्ठा राजकन्या आणि राजा वृषपर्वा, पश्चिमेस तेजस्वी शुक्र ग्रह, मीन राशीत जरा खाली कुंभ राशीत बुध आणि शनी ग्रह व तिमिंगल तारका समूह, दक्षिणेकडील आकाशात विविधरंगी अगस्त्य तारका, मृग नक्षत्रापासून सुरू झालेले लांबलचक एरिडानूस दिसेल. महाशिवरात्रीच्या उपवासासोबत आकाशातील ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करायला हवा, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.