अमरावती : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीच्‍या पर्वावर मोठी यात्रा भरते, हे तीर्थक्षेत्र मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर आहे. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भाविकांची वाढती गर्दी पाहता, महाराष्ट्र व मध्यप्रदेश प्रशासनाच्यावतीने यात्रेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या यात्रेवर पूर्णतः ग्रामीण संस्कृतीची छाप पडलेली दिसते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येने येतात.
लहान महादेव या नावाने ओळखले जाणारे सालबर्डी हे स्थळ मोर्शीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या अवतीभोवती घनदाट वृक्ष, एका कडेला पर्वतीय भाग व दुसऱ्या कडेला माडू व गडगा नदीचा संगम आहे.

याठिकाणी अनेक निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक स्थळे व ऐतिहासिक शिल्प आहेत. त्यामध्ये शिवलिंग भुयार, पांडव कचेरी, मुक्ताबाईचे मंदिर, मौन्य देव मंदिर, हत्तीडोहाचा समावेश आहे. भारतात महादेवाची दोन शक्तिपीठे आहेत. पचमढीला मोठा महादेव, तर सातपुड्याच्या कुशीत वसलेला लहान महादेव, सालबर्डी येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या काळात भक्तिभावाने भाविक त्रिशूल, डफडी व मुखी ‘महादेवा जातो गा’ या लोकगीताची आवर्तने करतो.

यामुळे परिसर अक्षरशः दुमदुमून जातो. सालबर्डी गावापासून एक किलोमीटर अंतरावर चालत गेल्यावर पहिल्या पायरीपासून भुयाराकडे जाणारा मार्ग सुरू होतो. जवळपास शंभर फूट उतरल्यानंतर एका विशाल दगडाच्या आतल्या पोकळीत सपाट जागेवर शिवलिंग आहे. सालबर्डी येथील सातपुडा पर्वताच्या उंच टोकावर एका गुफेमध्ये प्राचीन असे शिवलिंग आहे. हे शिवलिंग अतिशय पुरातन असल्याचे मानले जाते. भुयारामध्ये सुमारे १०० फूट आतमध्ये उतरल्यावर महाकाय दगडाच्या आतल्या पोकळीत सपाट असणाऱ्या जागेवर शिवलिंगाचे दर्शन होते. या पहाडावर भुयारातील या शिवलिंगासह मुक्ताबाईचं मंदिर, मौन्या देवाचे मंदिर आहे.

महाभारत काळात पांडव या भागात वास्तव्याला होते. पांडव कचेरी हे ते ठिकाण आहे. अतिशय पुरातन धार्मिक स्थळ म्हणून सालबर्डी हे ठिकाण ओळखले जाते.

महाशिवरात्रीच्या पर्वावर सुरू होणारी ही यात्रा पुढे पंधरा दिवस चालते. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यासह विविध भागातून भाविक सालबर्डीला महादेवाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून देखील अनेक भाविक सालबर्डीच्या यात्रेत येतात. या यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्‍ही राज्‍यातील पोलीस जागोजागी तैनात आहेत.

Story img Loader