‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्षातून’वर परिसंवाद
शफी पठाण
(राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी) वर्धा : बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला जातोय, शेतकरी हा शब्द आत्महत्या असाही लिहिला जाऊ शकतो, इतकी त्यांची अवस्था बिकट आहे. गांधी – विनोबांचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या या देशात हे घडतेय, याचा अर्थ आज गांधी – विनोबांचे विचार कालबाहय झाले आहेत, असे परखड प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनी केले. ते आज रविवारी साहित्य संमेलनात आयोजित ‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्षातून’ या विषयावर परिसंवादात बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते व राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे तर प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी व भानू काळे हे होते.
हेही वाचा >>>फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव
यावेळी श्रीकांत देशमुख म्हणाले, गांधी – विनोबांचा सदभावनेवर विश्वास होता. परंतु, २०१४च्या नवीन स्वातंत्र्यानंतर ही सदभावनाच नष्ट झाली आहे. बोलणाऱ्यांची जीभ छाटली जात असल्याने न बोलणाऱ्यांचीच परंपरा निर्माण होत आहे. कुठल्याही गोष्टीच्या चिकित्सेची परवानगी नाकारली जात आहे, याकडेही त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले.
गांधी – विनोबांचे नाव घेऊन विचारांना तिलांजली – देवेंद्र गावंडे
गांधी – विनोबांचे विचार सांगणे व त्यावर प्रत्यक्ष कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. आज गांधी – विनोबांचे नाव तर घेतले जाते. पण, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. नुकतेच सेवाग्राम येथे आयोजित गांधींवरील कार्यक्रमासाठी विदेशातून येणाऱ्या २२ पैकी १२ लोकांचा व्हिसा शेवटच्या क्षणापर्यंत अडकवून ठेवण्यात आला. असे का घडले, हा प्रश्न उपस्थित करून सरकारवर शंका घेतली जाऊ शकते. गांधींचा संदर्भ असलेल्या कलाकृतींना अटकाव घातला जात आहे आणि त्याचवेळी गोडसेवरील नाटकांचे रतिब पाडले जात आहेत. गोडसे आणि गांधींच्या विच़ारांचे द्वंद असे गोंडस नाव देऊन आपले छुपे धोरण राबवले जात आहे. परंतु, गोडसे आणि गांधी यांची वैचारिक तुलना होऊच शकत नाही. कारण, जिथे विचार संपतात तिथेच हिंसा सुरू होत असते. काही लोक म्हणतात, यापुढे एकच राजकीय पक्ष राहील. असे म्हणणेही गांधी विचारांचा खूनच आहे, असे स्पष्ट मत लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>अकोला: ‘भारताच्या नवनिर्माणात कृषी पदवीधरांची भूमिका…’, वाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले ते
आध्यत्मिक लोकशाहीमुळेच घटनात्मक लोकशाही अबाधित- सहस्त्रबुद्धे
गांधी-विनोबांनीही आध्यत्मिक लोकशाहीचा विचार नेहमी मांडला. आध्यत्मिक लोकशाहीमुळेच घटनात्मक लोकशाही अबाधित आहे, असे प्रतिपादन परिसंवादाचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. ते म्हणाले, आधी संमेलनात काही बाबतीत अस्पृशतेची छाया असायची. आता ते अस्पृशतेचे ढग दूर झाले आहेत. गांधी – विनोबांचे विचार सनातन आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे अयोग्य आहे. दांभिकतेचा वेढा सैल करायचा असेल तर आपल्या कृतीत आधी गांधी – विनोबा डोकावले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.