लोकसत्ता टीम
बुलढाणा: सुसंस्कृत अशी अेाळख असलेल्या बुलढाणा शहरात खुलेआम अवैधधंदे सुरू असून गांज्यासारख्या मादक व घातक पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. गल्ली बोळात वरली-मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. पोलिसांनी आठ दिवसात याला पायबंद घातला नाही तर थेट बुलढाणा पोलिस ठाण्यासमोरच मंडप टाकून वरली मटक्याचे दुकान थाटनार असल्याचा खळबळजनक इशारा महाविकास आघाडीच्या वतीने आमदार धीरज लिंगाडे यांनी येथे दिला. गत एक वर्षात शहरात गुंडागर्दीने कळस गाठल्याचा आरोपही त्यांनी केला.
विसर्जनाच्या धामधूमित गुरुवारी आपल्या संपर्क कार्यालयामध्य आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा इशारा दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, प्रदेश सचिव जयश्री शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, काँग्रेसचे सतीश मेहेंद्रे, सुनील सपकाळ आदी उपस्थित होते.
आणखी वाचा- डॉक्टर मंडळींच्या बाप्पाच्या ‘या’ मिरवणुकीचे लागले सर्वांना वेध
यावेळी आक्रमकपणे बोलणारे आमदार लिंगाडे यांनी अवैध धंद्यावर ताशेरे ओढताना राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. डॉक्टर लाईन, जुनी विहीर, बाजार समिती परिसर, कारागृहाच्या मागे, क्रीडा संकुल लगत, चिखली रोडवर सर्रास पणे गांजा पिणाऱ्यांच्या टोळ्या बसलेल्या राहतात. याकडे लक्ष वेधून त्यांना नेमके कोण गांजा पुरवते व बुलढाण्यात गांजा येथे कुठून? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बुलढाण्यातील गल्ली बोळात सुरू असलेली मटक्याच्या दुकानांची नावेच सांगत आमदार लिंगाडे यांनी पत्रपरिषदेत खळबळ उडवून दिली.यासंदर्भातील पुरावेही असल्याचे अधोरेखीत केले. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांच्या मर्जीसह या बाबी होत नसल्याचेही ते म्हणाले. अशा धंद्याच्या माध्यमातून काही ठरावीक मंडळी पैसा कमावत असल्याचेही आ. लिंगाडे म्हणाले. राहुल बोन्द्रे यांनी ‘वरच्या मंडळींचा’आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातही हीच स्थिती असल्याचे सांगून ऑनलाईन गेम्स च्या नादी लागून युवा वर्ग आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले.