बुलढाणा : जागावाटप अन् उमेदवारीचा गुंता कायम असलेल्या आणि दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील गुंता अर्धा तरी सुटल्याचे स्पष्ट राजकीय संकेत मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने अंतिम टप्प्यात ‘जोर’ न लावल्याने बुलढाण्याची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सुटणार असल्याचे वृत्त आहे. २० तारखेला नक्की झालेला उद्धव ठाकरेंचा दौरा याला दुजोरा देणारा ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरवी मोठ्या राजकारण्यांच्या खिजगणतीत नसलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जागावाटप व उमेदवारीचा गुंता कायम आहे. महायुतीतील तिढा तर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मागील तीन लढतीत सलग विजय मिळविणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या तिकिटाची ‘गॅरंटी’ नाही, असे विचित्र चित्र आहे. भाजपाने या जागेवर जोरकस दावा करून येथे लढण्याची सुसज्ज तयारी केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा राजकीय प्रतिष्ठेची बाब केली आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करणारी भाजपाही मागे हटायला तयार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

हेही वाचा – “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जागेसाठी राजकीय व भावनात्मकदृष्ट्या आग्रही आहे. बंडखोरांना कुठल्याही स्थितीत पराभूत करून जागा दाखवायची असा ‘मातोश्री’चा निर्धार आहे. यामुळे वाटाघाटीच्या पहिल्या फेरीपासून या जागेवर त्यांनी हक्क सांगितला. ही जागा मिळणारच, या खात्रीने अगदी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्या सभा येथे लावण्यात आल्या. मात्र काँग्रेसनेदेखील दावा केल्याने तिढा निर्माण झाला. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने एकंदर स्थिती व दस्तुरखुद्द ठाकरेंचा आग्रह व भावना लक्षात घेत ‘मैत्रीपूर्ण माघार’ घेतली. यामुळे निर्णायक वाटपात हा मतदारसंघ ‘मशाल’कडे गेल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.

याची वाच्यता करण्याचे टाळण्यात आले असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्याही वरिष्ठ नेत्यांनी याची पुष्टी केली. काँग्रेस प्रदेश समितीच्या एका पदाधिकाऱ्याने, उद्धव ठाकरे यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असे सांगितले.

हेही वाचा – पिवळ्या पळसाला आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या औषधी गुण व अंधश्रद्धा…

उद्धव ठाकरेंचा दौरा अन्…

फेब्रुवारीमधील अर्धवट दौरा पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे हे पुन्हा बुलढाण्यात जनसंवादसाठी येणे, लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांचा अलीकडचा दीर्घ मुक्कामी दौरा, त्यांनी मतदारसंघात लावलेला बैठकांचा धडाका, जनसंवादद्वारे पक्षप्रमुखांनी घाटावर व खाली घेतलेल्या सभा, या राजकीय घडामोडींवरून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्याचे स्पष्ट होत आहे.

जागा फायनल, पण उमेदवार कोण?

ही जागा शिवसेनेला सुटल्यात जमा असली तरी उमेदवार कोण? हा यक्षप्रश्न आहे. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, उमेदवार बदलाची चर्चा तेवढीच गरम आहे. काँग्रेसमधीलच एका महिला नेत्या आणि सध्या अपक्ष म्हणून भिडलेल्या युवानेत्याचे नाव चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी अगदी ‘मातोश्री’पर्यंत यासाठी संधान साधल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi finally decided about buldhana lok sabha constituency scm 61 ssb
Show comments