अमरावती : Bazar Committee Election Result माजी मंत्री आणि कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीसाठी यशदायी ठरली असून सर्व अठरा जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.
भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष मिळून बनलेल्या शेतकरी परिर्वतन पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या सहकार पॅनेलला या निवडणुकीत निर्विवाद यश मिळाले आहे. यशोमती ठाकूर यांच्या गटाची तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता होती, ती कायम राखण्यात या गटाला यश मिळाले आहे. सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश होऊ शकला नव्हता, राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी परिवर्तन पॅनलला साथ दिली.
निवडून आलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये स्वप्निल केने, विनायक तसरे, विवेक देशमुख, जयकांत माहोरे, गजानन वानखडे, राजेश वेरूळकर, मनोज साबळे, मेघा गोहत्रे, वंदना पाटेकर, रवींद्र राऊत, मंगेश राठोड, कैलासकुमार पनपालिया, तुळशीराम भोयर, राजेंद्र मडवे, विशाल सावरकर, अशोक मनोहर, जितेंद्र बायस्कर, मोहन चर्जन यांचा समावेश आहे.