अमरावती : महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वसुलीचे उच्चांक गाठले गेले. ज्यावेळी ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा होती, त्यावेळी सरकारमधील काही मंत्री ‘वर्क फ्रॉम जेल’ असे कार्यरत होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ रणजित पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी येथील दसरा मैदानावर आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नवनीत राणा, डॉ अनिल बोंडे, रामदास तडस, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, विभागातील भाजपचे आमदार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे अनैतिक सरकार होते. जनादेशाच्या विरोधात जाऊन ते स्थापन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवले. हिंदुत्वाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार दावणीला बांधणार नाही, असा इशारा देत त्यांनी आमच्या सोबत सरकार स्थापन केले आणि तुरुंगामधून चालणारा मंत्र्यांचा कारभार बंद झाला. आम्ही अमरावतीत उद्योग आणले, या ठिकाणी वस्त्रोद्योग संकुल उभे झाले. पण आता वेग वेगळ्या पक्षाचे लोक येथील गुंतवणूकदाराना, उद्योजकांना त्रास देण्याचे काम करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. या लोकांची नावे आपण घेणार नाही, पण ‘ ब्लॅकमेल ‘ करणाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारने सातत्याने विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय करण्याचे काम केले आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात या भागाला एक रुपया देखील मिळाला नाही, जो निधी सिंचन प्रकल्पांसाठी मिळाला, तोही केंद्र सरकारने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांची मुदत २०२० मध्ये संपली होती, पण महाविकास आघाडी सरकारने, विकास मंडळांची हत्या केली. आम्ही या वैधानिक विकास मंडळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. सोबतच नव्याने तयार झालेला अनुशेष मोजण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आम्ही विदर्भाला न्याय मिळवून देऊ, असे फडणवीस म्हणाले.
मागील सरकारच्या काळात पदभरती बंदच होती, ज्या काही जागा निघाल्या त्याच्या परीक्षेत, पदभरतीत घोटाळे उघड झाले. आता पद भरतीसाठी उशीर झाला तरी हरकत नाही, पण पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत. याशिवाय खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून चालत होते. पण हे सरकार प्रशासकीय निर्णय तातडीने घेणारे आहे, गेल्या सहा महिन्यात १८६ शासन निर्णय या सरकारने घेतले आहेत. आमचे सरकार विदर्भाचा अनुशेष संपविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा दोन वेळा उल्लेख केला.