नागपूर: व्हॉट्सॲप, फेसबुकसह विविध समाज माध्यमांवर मंदिर, मशीद, चर्चबाबत प्रतियुनिट विविध वीज दराचा दावा करत मंदिरसाठी सर्वाधिक दर असल्याचे संदेश फिरत आहे. हा संदेश नागरिकांची दिशाभूल करण्यासोबत सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करण्याचा प्रकार असल्याचा महावितरणचा दावा आहे. समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या संदेशात सामान्य नागरिकांसाठी प्रति युनिट वीज दर ७.८५ रुपये, मशिदीसाठी १.८५ रुपये, मंदिरसाठी ७.८५ रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात एका धर्माबाबत झुकते माप असल्याचे सांगत विविध चुकीचे दाखलेही दिले गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूरमध्ये मेट्रो स्थानकावर लवकरच ओपन एअर रेस्टॉरंट, कॅफे

समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभुल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करणारा असल्याने, अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार मंदीर, मशीद, गुरुव्दारा, चर्च या सारख्या प्रार्थना स्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी असे निर्देशित केले असून त्यानुसारच सर्व प्रर्थना स्थळांना वीजदर आकारणी केली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर अशा फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यापासून सावध राहाण्याचे आवाहन  महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान या खोट्या पद्धतीने संदेश पसरवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran clear about post viral on temple mosque church electricity rates zws